११ दिवसांत ९0 कोटींचा डोंगर
By Admin | Updated: March 15, 2015 00:29 IST2015-03-15T00:29:41+5:302015-03-15T00:29:55+5:30
एलबीटीचा प्रश्न : महापालिकेच्या अडचणी वाढण्याची चिन्हे

११ दिवसांत ९0 कोटींचा डोंगर
सांगली : चालू आर्थिक वर्षात १५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट घेऊन चालणाऱ्या एलबीटी विभागाची चिंता आता वाढली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास केवळ १५ दिवस शिल्लक असले तरी त्यातील चार शासकीय सुट्ट्या वगळता केवळ ११ दिवसच वसुलीसाठी महापालिकेच्या हाती राहिले आहेत. सध्याची महापालिकेची वसुली ६१ कोटींच्या घरात आहे. केवळ चालू वर्षाचे उद्दिष्ट गाठायचे झाले तरीही अकरा दिवसात ९० कोटी रुपये वसूल कसे होणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या एलबीटीचा प्रश्न आता क्लिष्ट बनला आहे. राज्य शासनाने एप्रिलपासून हा कर बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महापालिकेची चिंता अधिक वाढली आहे. कर संपुष्टात आल्यानंतरही महापालिकेला केवळ थकबाकी वसुलीसाठी हा विभाग जिवंत ठेवावा लागणार आहे. गत आर्थिक वर्षाची ६८ कोटी आणि चालू वर्षाचे १५० कोटी आणि थकबाकीवरील दंड व व्याज यांचा विचार केल्यास महापालिकेला अडीचशे कोटींवर वसुली करावी लागणार होती. चालू उद्दिष्टापैकी केवळ ६१ कोटी रुपये महापालिकेने वसूल केले आहेत. दंड व व्याज तूर्त बाजूला केले तरीही प्रशासकीय अंदाजानुसार आणखी ९० कोटी रुपये वसुली होणे आवश्यक आहे.
चालू आर्थिक वर्षात चार सुट्ट्या वगळता केवळ ११ दिवस शिल्लक आहेत. म्हणजे दररोज किमान नऊ कोटी रुपये वसूल होणे आवश्यक आहे. तेवढी वसुली होईल, अशी कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. सध्याच्या वसुलीचा वेग पाहता उर्वरित ११ दिवसात १० कोटी रुपये तरी जमा होतील की नाही, याची शंका आहे. त्यामुळे किमान ८० कोटींच्या थकबाकीचा फटका यंदा महापालिकेला बसणार आहे. याशिवाय मागील ६८ कोटी रुपयांच्या थकबाकीचीही चालू थकबाकीत भर पडणार आहे. त्यामुळे डोेकेदुखी अधिक वाढणार आहे. (प्रतिनिधी)