शिक्षक बँकेसाठी ९७.३२ टक्के मतदान
By Admin | Updated: April 26, 2015 01:07 IST2015-04-26T01:06:12+5:302015-04-26T01:07:20+5:30
प्रचंड चुरस : सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर आज मतमोजणी

शिक्षक बँकेसाठी ९७.३२ टक्के मतदान
सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या २१ जागांसाठी शनिवारी अत्यंत चुरशीने ९७.३२ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील २६ केंद्रांवर मतदान झाले. रविवारी मतमोजणी असून, दुपारी बारापर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहेत.
शिक्षक बॅँकेसाठी एकूण ५९६७ मतदार होते. त्यापैकी ५८०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. शिक्षक बँकेसाठी चौरंगी लढत होत असून, २१ जागांसाठी एकूण ७९ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. शिक्षक संघातील शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात गट, शिक्षक समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर गट व परिवर्तन पॅनेलमध्ये चुरशीची लढत होत आहे. गेल्या आठ दिवसांत उमेदवारांकडून संपूर्ण जिल्हा पिंजून काढला होता.
शनिवारी २६ केंद्रांवर चुरशीने मतदान झाले. मतदानासाठी सांगली, मिरज, विटा, आटपाडी, इस्लामपूर, शिराळा, कवठेमहांकाळ या तालुक्यांच्या ठिकाणी प्रत्येकी दोन मतदान केंद्रे, तर जतमध्ये तीन, संख, आष्टा, भिलवडी, कडेगाव, पलूस येथे एक मतदान केंद्र होते. मतमोजणी रविवारी येथील तरुण भारत क्रीडांगण कार्यालयात होत आहे. मतमोजणीला सकाळी आठ वाजता प्रारंभ होणार असून, दुपारी बारापर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहे.
शिक्षक बँकेसाठी शनिवारी सकाळपासून अत्यंत चुरशीने मतदान झाले. सांगलीमध्ये शिवशक्ती व्यायाम मंदिराशेजारच्या शाळा क्रमांक ६ मध्ये मतदान केंद्र होते. सकाळी आठ वाजताच मतदानासाठी रांग लागली होती. उमेदवारांचे कार्यकर्ते मतदारांना दुचाकीवरून आणत होते. (प्रतिनिधी)