शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सहयोगी प्राध्यापकांची ७९० पदे रक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST2021-09-18T04:27:47+5:302021-09-18T04:27:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सहयोगी प्राध्यापकांची तब्बल ७९० पदे रिक्त आहेत. त्या भरण्यासाठी महाराष्ट्र ...

790 posts of Associate Professors in Government Medical Colleges | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सहयोगी प्राध्यापकांची ७९० पदे रक्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सहयोगी प्राध्यापकांची ७९० पदे रक्त

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सहयोगी प्राध्यापकांची तब्बल ७९० पदे रिक्त आहेत. त्या भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाने प्रक्रिया सुरू केली आहे; पण आयोगाच्या कामकाजाची मंद गती पाहता ही पदे केव्हा भरली जातील याबाबत वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी साशंक आहेत.

राज्यात काही नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये मंजूर झाल्याने रिक्त जागांचा प्रश्न चर्चेत आला आहे. सातारा शासकीय सर्वोपचार रुग्णालयात व वैद्यकीय महाविद्यालयाला येत्या शैक्षणिक वर्षापासून १०० जागांवर प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने गुरुवारी (दि. १६) मंजुरी दिली. पण तेथे कामासाठी प्राध्यापकच उपलब्ध नाहीत. परिषदेच्या पाहणीवेळी मिरज, सांगली, पुणे व सोलापुरातून प्राध्यापक तात्पुरते नियुक्त केले होते. अलिबाग, सिंधुदुर्ग व उस्मानाबादेतही नव्या महाविद्यालयांचे काम सुरू आहे; पण तेथेही प्राध्यापक नाहीत.

सध्या राज्यभरात तीन-तीन महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर प्राध्यापक नियुक्तीस आहेत. एमपीएससीच्या भरतीप्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज करणाऱ्यांमध्ये सध्या मानधनावर काम करणारेच बहुसंख्येने आहेत. एमबीबीएसनंतर एमडी किंवा एमएस आणि किमान एक वर्षाचा निवासी डॉक्टर म्हणून सेवेचा अनुभव अशी पात्रता अपेक्षित आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपली. एमपीएससीच्या कार्यपद्धतीनुसार उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, गरजेनुसार चाळणी परीक्षा होईल. मुलाखती मात्र होणार आहेत. ही प्रक्रिया कितपत गतीने पूर्ण होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. नव्या महाविद्यालयांना यातूनच प्राध्यापक मिळणार आहेत.

चौकट

सातारा, अलिबागला मंजुरी, सिंधुदुर्गला नाही

राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने गेल्या महिन्यात नव्या महाविद्यालयांच्या प्रस्तावांची छाननी केली होती, त्यापैकी सातारा व अलिबागच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांना परिषदेने गुरुवारी मंजुरी दिली. नव्या भरतीप्रक्रियेतून त्यांना सहयोगी प्राध्यापक मिळतील. सिंधुदुर्गचा प्रस्ताव मात्र फेटाळला आहे. त्यांना पुन्हा तयारी करावी लागेल. उस्मानाबाद महाविद्यालयाची प्राथमिक कामे सुरू आहेत.

Web Title: 790 posts of Associate Professors in Government Medical Colleges