जिल्ह्यात आठ महिन्यांत ७९ महिला विकृत वासनेच्या शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:29 IST2021-09-21T04:29:18+5:302021-09-21T04:29:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शरद जाधव/सांगली : राज्यात एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना, जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी आहे. ...

जिल्ह्यात आठ महिन्यांत ७९ महिला विकृत वासनेच्या शिकार
लोकमत न्यूज नेटवर्क
शरद जाधव/सांगली : राज्यात एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना, जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी आहे. तरीही गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात ७९ महिला वासनेच्या शिकार बनल्या आहेत. ओळखीचा आणि महिला, मुलींच्या असहायतेचा गैरफायदा घेणाऱ्या नराधमांना पोलिसांनी गजाआड केले असून, सर्वच गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई झाली आहे.
कोरोनामुळे जनजीवन बाधित झाले असले तरी महिलांवरील अत्याचार मात्र कायम आहेत. यातील अनेक महिला अद्यापही पोलिसांकडे आल्याच नाहीत; तर ज्यांना त्रास असह्य झाला, त्यांनी पोलिसांत दाद मागत त्या नराधमांना कोठडीची हवा दाखविली आहे.
जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात अत्याचाराचे ७९ प्रकार घडले. त्यातील सर्व गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. यात पोक्सोअंतर्गत ५२ गुन्हे घडले आहेत. यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रकार घडले आहेत.
चौकट
गतवर्षीपेक्षा प्रकार वाढले
गेल्यावर्षी कोरोनामुळे लागू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले होते. आता निर्बंध शिथिल झाल्याने गु्न्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनाही वाढल्या आहेत. आठ महिन्यांत महिलांविषयक अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्या तरी त्यातील बहुतांश आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे.
चौकट
पोक्सोच्या कारवाया अधिक
अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे पन्नासहून अधिक प्रकार घडले. यात मुलींना फूस लावून पळवून नेत अत्याचार करण्याच्या प्रकारांचा समावेश होता. यातील आरोपींवर कारवाई, तर मुलींनाही सुरक्षा देण्यात आली.
चौकट
विनयभंगाच्या १६८ घटना
या आठ महिन्यांत जिल्ह्यात विनयभंगाच्या घटनांतही वाढ झाली आहे. त्यानुसार १६८ विनयभंगाचे प्रकार घडले आहेत. यातील सर्वच्या सर्व आरोपींवर अटकेची कारवाई झाली आहे.
चौकट
शंभर टक्के गुन्ह्यांची उकल
जिल्ह्यात अत्याचाराच्या ७९ घटना घडल्या. यातील सर्व गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. दिव्यांग अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या गुंतागुंतीचा तपासही पोलिसांनी पूर्ण केला आहे.
चौकट
जिल्ह्यातील आकडेवारी
महिलांवर अत्याचार ७९
बलात्कारपैकी पोक्सो ५३
एकूण विनयभंग १६८
छळ ९१
अपहरण १४०
पिटा १