जिल्ह्यात तीन वर्षांत ७८ रिव्हॉल्व्हर जप्त
By Admin | Updated: February 25, 2015 00:02 IST2015-02-24T23:19:54+5:302015-02-25T00:02:27+5:30
पोलिसांचा दणका : ९७ संशयितांना अटक

जिल्ह्यात तीन वर्षांत ७८ रिव्हॉल्व्हर जप्त
सांगली : गेल्या तीन वर्षांत पोलिसांनी एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल ७८ रिव्हॉल्व्हर जप्त केली आहेत. यामध्ये देशी, परदेशी बनावटीच्या व गावठी रिव्हॉल्व्हरचा समावेश आहे. पोलिसांच्या या कारवाईतून तब्बल ९७ संशयित रेकॉर्डवर आले आहेत. यातील अनेक संशयित रिव्हॉल्व्हरच्या तस्करीमध्ये गुरफटले असल्याने ते सातत्याने पोलिसांच्या हाती लागत आहेत. तस्करी रोखता येत नसली तरी, भविष्यात होणाऱ्या अनुचित प्रकारांना या कारवाईतून आळा बसेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्या कारकीर्दीत बेकायदा शस्त्रे विशेषत: रिव्हॉल्व्हर जप्त करण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. २०१३ मध्ये तब्बल ३६ रिव्हॉल्व्हर जप्त झाली होती. पोलिसांनी बिहारच्या एका तस्कराला सांगलीत पकडले होते. मात्र न्यायालयाकडून त्याला जास्त दिवस पोलीस कोठडी न मिळाल्याने तपास मुळापर्यंत गेला नाही. आतापर्यंतच्या सर्व कारवाईत पोलिसांचा तपास बिहार व उत्तर प्रदेशपर्यंत गेला आहे. गुन्हेगारी टोळ्यांसह काही तरुण शौक म्हणून रिव्हॉल्व्हर खरेदी करीत आहेत. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये पाच-दहा हजाराला मिळणाऱ्या या रिव्हॉल्व्हरची सांगली परिसरात पाच ते साठ हजाराला विक्री केली जात आहे. काही गुन्हेगार व्यावसायिक म्हणून या तस्करीत गुंतले आहेत.
दोन वर्षापूर्वी पोलीसप्रमुख सावंत यांनी रिव्हॉल्व्हर तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. अकरा रिव्हॉल्व्हर जप्त करुन २२ संशयितांना अटक केली होती. यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार सापडले होते.
हे गुन्हेगार जामिनावर बाहेर आले आहेत. त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हरसोबत काडतुसेही सापडतात. काडतुसे खराब होऊ नयेत म्हणून त्यांचा सराव करण्यासाठी गोळीबार केला जात असल्याचे प्रकार घडत आहेत. (प्रतिनिधी)
कारवाईवर एक नजर...
गेल्या तीन वर्षात सातत्याने रिव्हॉल्व्हर जप्त करण्याच्या कारवाया झाल्या आहेत. २०१२ मध्ये १६ रिव्हॉल्व्हर जप्त करुन २९ संशयितांना अटक केली होती. २०१३ मध्ये ३६ रिव्हॉल्व्हर, ४० संशयित, २०१४ मध्ये २३ रिव्हॉल्व्हर, ३६ संशयित, तर २०१५ च्या जानेवारीमध्ये ४ रिव्हॉल्व्हर जप्त करुन एका संशयितास अटक केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करुनही आजही पोलिसांना शस्त्रे सापडतच आहेत. बिहार व उत्तर प्रदेशमधून तस्करी करुन ही शस्त्रे आणली जात असल्याचे तपासात यापूर्वीच निष्पन्न झाले आहे. मात्र पोलिसांच्या तपासाला मर्यादा पडत असल्याने या दोन राज्यांपर्यंत तपास पोहोचत नाही. परिणामी शस्त्रांची तस्करी आणि विक्री सुरूच आहे.