सांगलीतील ७७ टॉवर घरपट्टीतून सुटले
By Admin | Updated: October 16, 2015 00:54 IST2015-10-15T23:08:43+5:302015-10-16T00:54:49+5:30
महापालिकेचा कारभार : लाखो रुपयांच्या उत्पन्नावर सोडले पाणी

सांगलीतील ७७ टॉवर घरपट्टीतून सुटले
सांगली : शहरातील १०९ पैकी केवळ ३२ मोबाईल टॉवरलाच घरपट्टी लागू करण्यात आली आहे. उर्वरित ७७ टॉवरला कराची आकारणी केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले असून, मोबाईल टॉवरवरील कारवाईही थंडावली आहे. सांगली शहरातील प्रभाग एकमध्ये ५२, प्रभाग दोनमध्ये ५७, कुपवाडमध्ये ६०, मिरजेत ४३ टॉवरची नगररचना विभागाकडे नोंद आहे. सांगली शहरात एकूण १०९ टॉवर आहेत. पण त्यापैकी केवळ ३२ टॉवरचीच घरपट्टी विभागाकडे नोंद आहे. महापालिकेच्याच दोन विभागातील टॉवरच्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. केवळ ३२ टॉवरचाच कर वसूल केला जातो. त्यांच्याकडेही २३ लाख रुपयांची थकबाकी आहे. मध्यंतरी मोबाईल टॉवरवर थकबाकीपोटी कारवाई सुरू करण्यात आली होती; पण आता ही कारवाईही बसनात गेली आहे. मोबाईल कंपन्या कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवित असताना महापालिका मात्र हक्काच्या उत्पन्नापासून वंचित आहे. याचे प्रशासनाला गांभीर्य दिसून येत नाही. केवळ कागदोपत्री कारवाईचा बडगा उगारला जातो. (प्रतिनिधी)
महापालिका हद्दीतील मोबाईल टॉवरची माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे. नगररचना व घरपट्टी विभागातील आकडेवारीत तफावत आहे. आता प्रभागातील स्वच्छता निरीक्षक व नगरसेवकांची एकत्र बैठक घेऊन त्या त्या प्रभागातील मोबाईल टॉवरचे सर्वेक्षण करणार आहोत. त्यानंतर टॉवरवर कराची आकारणी करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करू, असे स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांनी सांगितले.