पाणी टंचाई कृती आराखड्यात ७१ गावे
By Admin | Updated: March 26, 2015 00:05 IST2015-03-25T23:03:58+5:302015-03-26T00:05:07+5:30
जत तालुका : ५४१ वाड्या-वस्त्यांचाही समावेश, एक कोटी साठ लाख खर्चाचा प्रस्ताव सादर

पाणी टंचाई कृती आराखड्यात ७१ गावे
जयवंत आदाटे - जत तालुक्यातील ७१ गावे व ५४१ वाड्या-वस्त्यांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी एक कोटी साठ लाख ४८ हजार रुपये इतक्या खर्चाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या आराखड्याची १ एप्रिल ते ३0 जून या कालावधित अंमलबजावणी केली जाणार आहे.प्रतिवर्षी तालुक्यात १ जानेवारी ते ३१ मार्चअखेर संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करुन त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात येत होते. परंतु सध्याच्या आर्थिक वर्षात येथे कमी प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाने जानेवारी ते ३१ मार्चअखेरचा आराखडा तयार केला नाही.उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विहिरी, कूपनलिका, साठवण तलाव येथील पाण्याची पातळी वेगाने घटत आहे. कुडणूर व खोजनवाडी या गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. तहसीलदार अभिजित पाटील-सावर्डेकर यांनी, या दोन गावांतील प्रस्ताव सर्वेक्षणासाठी पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे पाठविले असल्याचे सांगून, अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही तत्काळ होईल, अशी माहिती दिली.तात्पुरती उपाययोजना म्हणून खोजनवाडी येथील कूपनलिका अधिग्रहण करुन तेथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेंतर्गत पश्चिम भागातील एकोणीस गावात मुख्य कालव्यातून पाणी आले आहे. त्या परिसरातील पाणी टंचाई कमी तर तालुक्याच्या पूर्व आणि दक्षिण भागात पाणी टंचाई जाणवणार आहे.
विहिरींचे अधिग्रहण अन् टँकरचे प्रस्ताव
६७ गावे व त्याखालील ५४१ वाड्या-वस्त्यांसाठी ९४ विहिरींचे अधिग्रहण करुन संभाव्य पाणीटंचाईवर उपाय करण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे. यासाठी २७ लाख ४८ हजार रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. ४९ गावे व त्याखालील ४३८ वाड्या-वस्त्यांवरील ५३ टँकरचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी एक कोटी तेहतीस लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.