पंधरा टक्के हृदयावर ६६ टक्क्यांची मोहर

By Admin | Updated: June 10, 2015 00:30 IST2015-06-09T22:49:12+5:302015-06-10T00:30:37+5:30

जिद्द चिकाटीला यशाचे पाठबळ : दिंडनेर्लीतील ज्योती पाटीलच्या यशापुढे गगनही ठेंगणे

66 percent stamp on fifteen percent heart | पंधरा टक्के हृदयावर ६६ टक्क्यांची मोहर

पंधरा टक्के हृदयावर ६६ टक्क्यांची मोहर

सागर शिंदे :दिंडनेर्ली ::जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर हृदयरोगाने त्रस्त असलेल्या दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील ज्योती प्रताप पाटील या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेमध्ये ६६ टक्के गुण मिळवून इच्छा, आकांक्षांच्यापुढे गगनही ठेंगणे पडते याची प्रचिती दिली आहे. वर्षभर दहावीचा अभ्यास केल्यानंतर ऐन परीक्षेच्या तोंडावर हृदयविकाराचे निदान झाल्यानंतर तिच्या आणि आईच्या पायाखालची वाळूच सरकली होती. मात्र, कठीण प्रसंगाला धीराने तोंड देत ती चक्क रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात अभ्यास करून रुग्णवाहिकेतून परीक्षा देऊन तिने उज्ज्वल यश मिळवले.
ज्योतीला धाप लागून अत्यवस्थ वाटू लागल्याने तिला तातडीने उपचारासाठी कोल्हापुरातील दवाखान्यात दाखल केले. तपासणी केल्यानंतर मात्र तिला व तिच्या आईवर आभाळच कोसळले. कारण ज्योतीचे हृदय नेहमीप्रमाणे काम करीत नसल्याने ते प्रसरण पावले आहे. त्यामुळे फुप्फुसात पाणी झाले होते. ते पाणी डॉक्टरांनी काढून टाकले आहे. हृदयविकाराची कार्यक्षमता एकदमच कमी झाल्याने तिला हॉस्पिटलमधून बाहेर काढणेही धोकादायक वाटत होते. त्यावेळी तिचे हृदय फक्त १५ टक्केच काम करीत होते. त्यामुळे तिच्या जीविताला धोका होता; पण दोन दिवसांनी दहावीची वार्षिक परीक्षा... व ती नाही दिली, तर आतापर्यंतचे सर्व श्रम वाया जाणार... त्यामुळे ज्योतीने सर्वांपुढे हट्ट धरून उपचार सुरू असतानाच परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तिची जबरदस्त इच्छाशक्ती पाहून परीक्षेला जाण्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका व दोन डॉक्टरही तिच्यासोबत दिले. करवीर तालुक्यातील इस्पुर्ली येथील परीक्षा केंद्रावर तिला स्पेशल केस म्हणून तिची स्वतंत्र बैठक व्यवस्था केली. मात्र, ज्योतीने स्पेशल केस नाकारत सर्व विद्यार्थ्यांसोबतच परीक्षा दिली. पेपर संपताच पुन्हा तिच्यावरील उपचार सुरू होत होते. हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातही तिचा अभ्यास सुरूच व्हायचा. चार वर्षांपूर्वीच ज्योतीच्या वडिलांचे निधन झाले आहे. करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली या गावात ज्योती आणि तिची आई, तिचा मामा सचिन मेटील यांच्याकडेच राहते. आई मोलमजुरी करून घरखर्च भागवते. त्यामुळे आपण मोठे होऊन आईला मदत करायची तिची इच्छा आहे. हृदयविकाराचे निदान अचानक झाल्याने ज्योतीच्या आईला अजूनही हे स्वीकारणं जड जातंय. मात्र, ज्योतीला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी आता तिची धडपड सुरू आहे. तिच्या या कष्टाचे फळ तिला या निकालाच्या निमित्ताने मिळाले; पण त्याचबरोबर ज्योतीच्या जिद्दीने सर्वांनाच थक्क केले आहे. अभ्यास झाला नाही म्हणून परीक्षा टाळणारे किंवा परीक्षेच्या भीतीने आयुष्यच संपविणारे अनेकजण पाहायला मिळतात; पण परीक्षेच्या तोंडावर मोठा आजार उद्भवलेला असतानाही धैर्याने परीक्षेला सामोरे जाणाऱ्या ज्योतीचं कौतुक होत आहे. आपल्या यशामध्ये अडचणीच्या, दु:खाच्या प्रसंगी प्रत्येक क्षणाला सोबत असणारी आपली आई, मामा, आजी, आजा, शिक्षक, डॉक्टर, मित्र-मैत्रिणी यांचा वाटा मोलाचा असल्याचे मत ज्योतीने सांगितले.

Web Title: 66 percent stamp on fifteen percent heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.