जिल्ह्यातील गॅस ग्राहकांना ६६ कोटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST2021-03-30T04:17:06+5:302021-03-30T04:17:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदान गेल्या ११ महिन्यांपासून बंद असल्याने या काळात जिल्ह्यातील ग्राहकांना ६६ ...

66 crore for gas consumers in the district | जिल्ह्यातील गॅस ग्राहकांना ६६ कोटीचा फटका

जिल्ह्यातील गॅस ग्राहकांना ६६ कोटीचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदान गेल्या ११ महिन्यांपासून बंद असल्याने या काळात जिल्ह्यातील ग्राहकांना ६६ कोटीहून अधिक रकमेचा भुर्दंड सोसाावा लागला आहे. गॅसच्या महागाईच्या भडक्यात सामान्यांचे बजेट खाक झाले आहे.

जिल्ह्यात १४.२ किलोच्या घरगुती गॅसचे वापरकर्ते ६ लाख ९२ हजार इतके असून, त्यात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे १ लाखावर ग्राहक आहेत. म्हणजेच सात लाखावर ग्राहकांना गेल्या काही वर्षांपासून प्रतिसिलिंडर अनुदान मिळत होते. मे २0२0 पासून हे अनुदान बंद झाले आहे. ज्या महिन्यात अनुदान बंद झाले त्यावेळी प्रतिसिलिंडर सरासरी ८९ रुपयांचे अनुदान जिल्ह्यातील गॅस ग्राहकांना मिळत होते. विविध गॅस एजन्सीजकडील माहितीनुसार पाचजणांच्या एका कुटुंबाला सरासरी सव्वा महिन्यास एक सिलिंडर लागतो. गेल्या ११ महिन्यात प्रत्येक कुटुंबाने ८ ते ९ सिलिंडर वापरले आहेत. यावरील अनुदानापोटी मिळणारे एकूण सरासरी ८८२ रुपये शासनाकडून मिळालेले नाहीत. प्रतिग्राहक छोटी वाटणारी ही रक्कम जिल्ह्यातील एकूण ग्राहकसंख्येचा विचार केल्यास, सुमारे ६६ कोटी १५ लाख इतकी होते. त्यामुळेच इतक्या मोठ्या रकमेचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागला आहे.

चौकट

वर्षात २३० रुपयांनी सिलिंडर महागले

घरगुती गॅस सिलिंडरचा मे २०२० मध्ये दर ५९० इतका होता. मार्च २०२१मध्ये तो ८२२ रुपये झाला आहे. ११ महिन्यात तब्बल २३२ रुपयांची वाढ दरात झाली. त्यामुळे दरवाढीचा हा भार सोसणे आता गॅस ग्राहकांना असह्य होत आहे.

चौकट

उज्ज्वला योजनेलाही ग्रहण

उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांना हा महागडा सिलिंडर पचनी पडत नसल्याने यातील अनेकांनी सिलिंडर घेणे थांबविले आहे. दारिद्रयरेषेखालील अनेक कुटुंबांनी पुन्हा गॅस सिलिंडरचा वापर करण्याऐवजी चुली पेटविल्या आहेत. जिल्ह्यात मार्च महिन्यात गॅस सिलिंडरच्या विक्रीतही घट झाली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरकडे पाठ फिरविणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

चौकट

जिल्ह्यातील कंपनीनिहाय घरगुती गॅस ग्राहक...

एचपीसीएल ३.५१ लाख

बीपीसीएल २.७५ लाख

आयओसीएल १.१२ लाख

Web Title: 66 crore for gas consumers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.