मांगले येथे दीड तासात ५८ मिलिमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:28 IST2021-05-09T04:28:17+5:302021-05-09T04:28:17+5:30
शुकवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मांगले, सागाव, कांदे, देववाडी, लादेवाडी, चिखलवाडी, शिंगटेवाडी परिसरात वादळी वारे व विजांच्या कडकडासह ...

मांगले येथे दीड तासात ५८ मिलिमीटर पाऊस
शुकवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मांगले, सागाव, कांदे, देववाडी, लादेवाडी, चिखलवाडी, शिंगटेवाडी परिसरात वादळी वारे व विजांच्या कडकडासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपून काढले. जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांवरील कौले पत्रे उडून गेली. त्याचबरोबर पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.
मांगले - कांदे मार्गावर विद्युत तारा रस्त्यावर पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्याचबरोबर शेतामध्येही अनेक ठिकाणी विजेचे पोल मोठ्या प्रमाणात पडले आहेत. शुक्रवारी ५ वाजल्यापासून शनिवारपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नळ पाणीपुरवठा ठप्प झाला होता. लोकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली.
वादळी पावसामुळे आंबा फळाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली तसेच भाजीपाला पिकांचे फार मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी साठा करून ठेवलेला जनावरांचा चारा भिजून नुकसान झाले. दरम्यान वादळी वाऱ्यामुळे आडसाली ऊस पिके जमीनदोस्त झाली आहेत. मांगले परिसरातील सर्व ओढे भरून वाहत होते. पाणी रस्त्यावर आल्यामुळे काही काळ वाहतूक बंद झाली होती. जोरदार पावसामुळे परिसरातील सर्वच तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.