पालिकांसाठी ५४१ उमेदवार रिंगणात
By Admin | Updated: November 11, 2016 23:50 IST2016-11-11T23:50:06+5:302016-11-11T23:50:06+5:30
जिल्ह्यात १६१ जागा : नगराध्यक्षपदासाठी २८ उमेदवार; बहुरंगी लढती रंगणार

पालिकांसाठी ५४१ उमेदवार रिंगणात
सांगली : जिल्ह्यातील पाच नगरपालिका व तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३१६ उमेदवारांनी माघार घेतल्याने १६१ जागांसाठी ५४१ उमेदवार रिंगणात असणार आहेत. शिराळा येथील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने तेथील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे, तर जिल्ह्यातील पाच नगरपालिकांतील नगराध्यक्ष पदासाठी २८ उमेदवार लढत देणार आहेत.
अर्ज माघारीची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाल्याने जिल्ह्यातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून बहुतांश ठिकाणी बहुरंगी लढती होणार आहेत. तासगाव, पलूस आणि कवठेमहांकाळमध्ये चौरंगी, पंचरंगी लढती होणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी इस्लामपूरला चौरंगी, विटा येथे तिरंगी, पलूस, तासगावला बहुरंगी, तर आष्टा येथे दुरंगी लढत होणार आहे.
इस्लामपूर नगरपालिकेसाठी २८ जागांसाठी १२७ अर्ज दाखल करण्यात आले होते. एक जागा बिनविरोध झाल्याने २७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातील ५४ उमेदवारांनी शुक्रवारी माघार घेतल्याने आता ७२ उमेदवार रिंगणात उरले आहेत. नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होणार असून, आज ११ पैकी ७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे विजयभाऊ पाटील, विकास आघाडीचे निशिकांत पाटील, तिसऱ्या आघाडीचे विश्वास सायनाकर, एमआयएमचे शाकीर तांबोळी यांच्यात लढत होणार आहे.
विटा नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ८३ पैकी २६ उमेदवारांनी माघार घेतल्याने २४ जागांसाठी ५७ उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी येथील निवडणूक लक्षवेधी ठरणार असून आजी माजी आमदारांत लढत होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी सत्ताधारी कॉँग्रेसकडून माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या स्नुषा प्रतिभा वैभव पाटील, शिवसेनेकडून आ. अनिल बाबर यांच्या स्नुषा शीतल अमोल बाबर आणि रासपच्या पूजा नागेश तारळेकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
तासगाव नगरपालिकेत २१ जागांसाठी ८३ उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ उमेदवारांनी माघार घेतली. तासगावात सर्वच प्रभागात बहुरंगी लढत रंगणार आहे. नगराध्यक्ष पदासाठीही १० जण लढत देणार आहेत. यात प्रामुख्याने अॅड. संजय सावंत (राष्ट्रवादी), डॉ. विजय सावंत (भाजप) आणि शिवाजी शिंदे (कॉँग्रेस) यांच्यासह इतर उमेदवारात लढत होत आहे. नगराध्यक्ष पदासाठी सावंत बंधूंतील लढत लक्षवेधी ठरणार आहे.
आष्टा नगरपालिकेतील २१ जागांवर ५४ उमेदवार आता लढत देणार आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १४२ उमेदवारांपैकी ९२ उमेदवारांनी माघार घेतली. सत्ताधारी शहर विकास आघाडी व लोकशाही आघाडीमध्ये थेट लढत होणार असून १२ अपक्षही निवडणूक लढविणार आहेत. नगराध्यक्षपदासाठीही स्नेहा संभाजी माळी व लता अमोल पडळकर यांच्या थेट लढत होणार आहे.
पलूस येथे १७ जागांसाठी ८५ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. शुक्रवारी ७ उमेदवारांनी माघार घेतली आहे. येथे पंचरंगी लढतीचे संकेत मिळाले असून नगराध्यक्षपदासाठी ९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. यात राष्ट्रवादी, कॉँग्रेस, भाजपसह इतर पक्ष व अपक्षांचा समावेश आहे.
नगराध्यक्षपदासाठी चुरस
जिल्ह्यातील पाच नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेतून मतदान होणार असल्याने लढती चुरशीच्या होणार आहेत. यात प्रामुख्याने इस्लामपूर येथे राष्ट्रवादीचे विजयभाऊ पाटील व विकास आघाडीचे निशिकांत पाटील यांच्या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विटा येथे शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांच्या स्नुषा शीतल बाबर आणि माजी आ. सदाशिव पाटील यांच्या स्नुषा प्रतिभा पाटील यांच्यातील लढत मोठ्या चुरशीची ठरणार आहे. तासगाव येथे अॅड. संजय सावंत आणि डॉ. विजय
सावंत या दोघा बंधूमधील लढतही तितकीच लक्षवेधी ठरणार आहे.