५४ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखणार
By Admin | Updated: January 15, 2016 00:27 IST2016-01-14T23:38:35+5:302016-01-15T00:27:04+5:30
जिल्हा परिषद : स्वच्छ भारत अभियानातील कसूर भोवली

५४ ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखणार
सांगली : स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय उभारणीसाठी दिलेले उद्दिष्ट पूर्र्ण करण्यात दिरंगाई करणाऱ्या जिल्ह्यातील ५४ ग्रामसेवकांना त्यांची एक वेतनवाढ रोखण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटिसीला आठवड्याभरात उत्तर देण्याची संधी देण्यात आली असून, येत्या तीन महिन्यांत उद्दिष्टपूर्ती करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांनी गुरुवारी दिली.
जिल्ह्यात निर्मलग्राम नसलेल्या १०७ गावांमध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय उभारणीचे काम सुरू आहे. यातील ५४ गावांत, दिलेल्या उद्दिष्टांपेक्षाही कमी काम होत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यासाठी संबंधित गावांच्या ग्रामसेवकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयाची कमी कामे झालेली गावे पुढीलप्रमाणे : शिराळा तालुका- धामवडे, गुढे, तडवळे, शिराळा, चिखलवाडी, वाकाईवाडी, पाडवेवाडी, खुजगाव व येळापूर या गावांत दहा टक्क्यांपेक्षाही कमी काम झाले आहे, तर रेड, पाचुंब्री, हातेगाव, मणदूर, निगडी, करंजगी, खिरवडे, कदमवाडी, चिंचोळी, पणुंब्रे, पावळेवाडी, वाकुर्डे बुद्रुक व गिरजवडे या गावात २५ टक्क्यांपेक्षाही कमी काम झाले आहे. वाळवा : कासेगाव, बोरगाव, वाळवा, तुजारपूर, चिकुर्डे. जत तालुका : वाळेखिंडी, बेवनूर, आवंढी, उमराणी, मिरज तालुका : माधवनगर, बेडग, खटाव. तासगाव तालुका : पेड, येळावी, वायफळे, कुमठे, सावर्डे, सावळज, नागाव कवठे, लिंब, आटपाडी तालुका : करगणी. कवठेमहांकाळ तालुका : कोकळे, थबडेवाडी, खरशिंग, इरळी, कवठेमहांकाळ, तिसंगी, नागज, चुडेखिंडी, हिंगणगाव, नांगोळे व कुकटोळी या गावांच्या सर्व ग्रामसेवकांना वेतनवाढ रोखण्याची नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.
या कारवाईमुळे ग्रामसेवकांत खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
शिराळ्यातील सर्वाधिक गावे
वैयक्तिक शौचालय बांधणीस १२ हजार रुपयांचे अनुदानही देण्यात येत असताना, जिल्ह्यातील ५४ गावांत या अभियानाने गती पकडली नव्हती. त्यासाठी ग्रामसेवकांना वारंवार सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवकांना एक वेतनवाढ रोखण्याची नोटिसा बजाविण्यात आली आहे. यात शिराळा तालुक्यातील सर्वाधिक २२ गावांचा समावेश आहे.