सांगली : शहरातील पत्रकारनगर येथे कमी दरामध्ये सोने देण्याच्या आमिषाने सहा जणांची ५२ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी भास्कर तात्यासाहेब मुळीक (वय ६५, रा. संभाजी कॉलनी, टिंबर एरिया, सांगली) यांनी विराज विजय कोकणे व दीपाली विराज कोकणे (दोघेही रा. संभाजी कॉलनी, टिंबर एरिया, सांगली) यांच्याविरोधात शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कमी दरात सोने देण्याचे संशयित कोकणे यांनी मान्य केले होते. त्यामुळे पान दुकान व्यावसायिक असलेले मुळीक यांनी ८ लाख रुपये, तर त्यांच्या ओळखीचे दत्ता पाटील (रा. तानंग) यांनी ५ लाख रुपये, अमित पाटील (सांगली) यांचे ४ लाख ३० हजार, संतोष सोलापुरे (सांगली) यांचे १० लाख ८० हजार रुपये, महावीर आलासे (रा. शिंदेमळा, सांगली) यांनी १४ लाख रुपये, विश्वास सावंत (रा. कुमठे) व प्रकाश पाटील (रा. विजयनगर, सांगली) अशा सर्वांनी ५२ लाख ९० हजार रुपये दिले होते. एप्रिल २०२१ ते १५ जुलै २०२१ या कालावधीत पत्रकारनगर येथील पौर्णिमा अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ७ मध्ये हा व्यवहार झाला होता. पैसे देऊनही सोने मिळत नसल्याने मुळीक यांनी पाठपुरावा केला. मात्र, कोकणे यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने अखेर सांगली शहर पोलिसांत मुळीक यांनी फसवणुकीची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.