मिरज पूर्व भागातून दररोज ५० टन केळीची निर्यात
By Admin | Updated: December 11, 2014 23:41 IST2014-12-11T22:45:39+5:302014-12-11T23:41:12+5:30
रोपांची वाढती मागणी : अडीचशे एकरात केळीची लागवड

मिरज पूर्व भागातून दररोज ५० टन केळीची निर्यात
टाकळी : मिरज पूर्व भागातील शेतकरी खर्च कमी व उत्पादन जास्त देणाऱ्या पिकांकडे वळत आहे. ऊस उत्पादन घेणारा शेतकरी केळी उत्पादनाकडे वळला असून मिरज पूर्व भागामध्ये २५० एकर क्षेत्रातात लागवड झाली आहे. दररोज ५० टन केळीची निर्यात केली जात आहे.
पूर्व भागातील शेतकरी भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून द्राक्षशेतीकडे मोठ्याप्रमाणात वळले. पण द्राक्ष उत्पादन खर्च व मिळणारा भाव यात तफावत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले. द्राक्षशेतीपेक्षा केळी उत्पादन शेतकऱ्यांना फायद्याचे होत असल्याने पूर्व भागातील एरंडोली, सलगरे, बेळंकी, मल्लेवाडी, आरग, बेडग, टाकळी, बोलवाड येथील शेतकऱ्यांचा केळी उत्पादनाकडे कल वाढला आहे. पूर्व भागात सुमारे २५० एकर क्षेत्रामध्ये केळी उत्पादन घेतले जात आहे. पूर्व भागातून दररोज ५० टन केळी निर्यात केली जात आहे. स्थानिक व्यापारी शेतकऱ्यांकडून माल खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना टनास १२ ते १४ हजार रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बॉक्स पॅकिंग व वाहतुकीचाही खर्च वाचत आहे. एक वर्षात एकरी ३५ ते ४० टन केळीचे उत्पन्न शेतकरी काढत आहेत. द्राक्षशेतीच्या तुलनेत उत्पादन खर्चही कमी असल्याने केळी उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. बोलवाड येथील प्रगतशील शेतकरी प्रवीण पाटील यांनी पाच एकर केळी बाग लावली आहे. त्यांनी एकरी ३५ ते ३७ टन विक्रमी उत्पादन घेतले आहे. मिरज पूर्व भागात म्हैसाळ योजनेमुळे ढबू, टोमॅटो तसेच ऊस उत्पादनावर शेतकऱ्यांचा भर होता. औषध व मजुरांचा खर्च अत्यल्प असल्याने केळी उत्पादनाला शेतकरी महत्त्व देऊ लागला आहे. पूर्व भागात द्राक्ष, ऊस उत्पादनाची जागा केळीच्या बागा घेऊ लागल्याचे चित्र आहे. सुशिक्षत तरूणांचा केळीच्या शेतीकडे सर्वाधिक कल आहे. (वार्ताहर)
रोपांचा तुटवडा
जळगाव येथून केळीची रोपे आयात केली जातात. एक रोप परिपूर्ण होण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडून रोपांना वाढती मागणी आहे. रोपांची टंचाई असल्याने शेतकऱ्यांनी मे महिन्यासाठी रोपांची मागणी नोंदवली आहे, असे मत बोलवाडचे रोपे विक्रेते रवींद्र पाटील यांनी सांगितले.