लग्नाला ५०, अंत्यविधीला वीसजणांना परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:26 IST2021-03-17T04:26:54+5:302021-03-17T04:26:54+5:30
सांगली : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी ...

लग्नाला ५०, अंत्यविधीला वीसजणांना परवानगी
सांगली : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.
डॉ. चौधरी यांनी सांगितले की, चित्रपटगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये ५० टक्केच उपस्थिती ठेवावी. मॉलमध्ये मास्क व तापमान मोजल्याशिवाय प्रवेश देऊ नये. सॅनिटायझर बंधनकारक आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांना मनाई आहे. लग्नकार्यासाठी फक्त ५० व्यक्तींनाच एकत्र येता येईल. आदेशाचे उल्लंघन झाल्यास या संस्था व मालमत्ता कोविडकाळात बंद केल्या जातील. दंड व कायदेशीर कारवाई केली जाईल. अंत्यसंस्कारासाठी वीसपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध असेल. या नियमांचे पालन होत असल्यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांना लक्ष ठेवावे लागेल.
डॉ. चौधरी म्हणाले की, गृह अलगीकरणातील व्यक्ती व त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर यांची माहिती स्थानिक वैद्यकीय अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांना देणे बंधनकारक आहे. रुग्ण अलगीकरणात राहत असलेल्या घराच्या दरवाजावर १४ दिवस फलक लावावा. रुग्णावर गृह अलगीकरणाचा शिक्का मारावा. रुग्णाच्या कुटुंबाने शक्यतो बाहेर पडू नये. रुग्णाने अलगीकरणाचे उल्लंघन केल्यास त्याची रवानगी संस्थात्मक अलगीकरणामध्ये केली जाईल. हा आदेश ३१ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहील.