बालगंधर्व स्मारकासाठी ५० लाखांचा निधी मंजूर
By Admin | Updated: July 26, 2015 00:17 IST2015-07-26T00:06:41+5:302015-07-26T00:17:16+5:30
‘लोकमत’ इफेक्ट : नागठाण्यातील रखडलेल्या बांधकामास मिळणार गती

बालगंधर्व स्मारकासाठी ५० लाखांचा निधी मंजूर
सांगली : नागठाणे (ता. पलूस) येथील नटसम्राट बालगंधर्व स्मारकाचे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने तातडीने ५० लाखांचा निधी शनिवारी मंजूर केला. चालू वर्षात कोणत्याही परिस्थितीत हा निधी खर्च करण्याची सूचना राज्य शासनाने दिली आहे.
मराठी संगीत रंगभूमीला तेजोवलय प्राप्त करून देणाऱ्या बालगंधर्वांच्या व्यक्तिगत आयुष्यात ज्यापद्धतीने संघर्ष वाट्याला आला, त्याचपद्धतीचा संघर्ष त्यांच्या जन्मगावी असलेल्या स्मारकाच्या वाट्याला आला आहे. बालगंधर्वांच्या पावलांनी रंगभूमी पावन झाल्याच्या गोष्टीला ११० वर्षे उलटली तरी, त्यांच्याच जन्मगावी त्यांच्या नावाचे स्मारक उभे राहू शकलेले नाही. राजकीय नेत्यांची अनेक भव्य स्मारके राज्यभरात उभारली जात असताना, रंगभूमीला सुवर्णकाळ दाखविणाऱ्या या महान कलाकाराच्या स्मारकाला आणि नाट्यगृहाला शासनाच्या निधीसाठी ताटकळत रहावे लागत आहे. ‘लोकमत’ने १५ जुलैरोजी बालगंधर्वांच्या स्मृतिदिनी या गोष्टीवर प्रकाशझोत टाकला होता. मतदारसंघातील आ. पतंगराव कदम यांनीही या गोष्टीची दखल घेत शासनाकडे निधीची मागणी केली होती. राज्य शासनाने याची दखल घेत आता तातडीने ५० लाखांचा निधी मंजूर केला होता.
स्मारकाच्या उभारणीचा प्रश्न २००५ पासून प्रलंबित आहे. जागेचा वाद मिटल्यानंतर नागठाणेच्या स्मारक उभारणीच्या कामास १७ फेब्रुवारी २००९ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. ३ कोटी ४६ लाखांच्या कामास त्यावेळी मंजुरी मिळाली होती. मंजुरी मिळाल्यानंतरही स्मारकाचे काम सुरू होण्यासाठी तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागली. १६ आॅक्टोबर २०१२ रोजी बांधकामास सुरुवात झाली. ४२ लाख ६० हजार रुपयांचे पाईल्स व पिलरचे काम झाल्यानंतर काम पुन्हा थांबले. आता शासनाच्या निधीसाठी प्रशासकीय पाठपुरावा सुरू आहे. स्मारकासाठी झालेल्या बैठकीलाही आता वर्ष उलटले आहे. निधीसाठी अनेकदा शासनाचे उंबरे झिजविण्यात आले.
शासनाने ५० लाखांचा निधी चालूवर्षी तातडीने खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. बांधकामाचा हा निधी असला तरी तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग न करता संबंधित तहसीलदारांकडे देऊन तो खर्च करावा. तहसीलदारांना यासाठी संवितरण अधिकारी म्हणू नेमावे, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे बालगंधर्वांच्या स्मारकाचे रखडलेले काम आता मार्गी लागणार आहे. (प्रतिनिधी)