पुणदीतील संस्थेस ५0 लाखांचा गंडा
By Admin | Updated: August 12, 2014 23:18 IST2014-08-12T22:56:25+5:302014-08-12T23:18:08+5:30
तिघांवर गुन्हा : ठेकेदार कंपनी कोल्हापूरमधील, धनादेशाद्वारे पैसे दिले

पुणदीतील संस्थेस ५0 लाखांचा गंडा
तासगाव : पुणदी (ता. तासगाव) येथील सावित्रीबाई फुले बॅकवर्ड को—आॅप. इंडस्ट्री या संस्थेतील इलेक्ट्रीक कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने संस्थेची ५0 लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद संस्थेचे संचालक संजय शंकर पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी कोल्हापूर येथील शिवम इलेक्ट्रीकलचे अभिजित रमेश यादव, त्याचा भाऊ अनिरुध्द व वडील
रमेश शंकर यादव यांच्याविरुध्द
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कामासाठी अभिजित यादव
यास २0 डिसेंबर २0१२ रोजी धनादेशाद्वारे पैसे अदा करण्यात आले होते.
कच्च्या लोखंडापासून सळई तयार करण्याचा हा प्रकल्प असून, या प्रकल्पाच्या इलेक्ट्रीक कामांची निविदा २५ आॅगस्ट २0१२ रोजी काढली होती. वर्तमानपत्रात निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार शिवम इलेक्ट्रीकल यांची ७७ लाख ७५ हजारांची निविदा प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग पुणे यांनी १0 सप्टेंबर २0१२ रोजी मंजूर केली. निविदा मंजूर झाल्यानंतर अभिजित यादवने संस्थेकडे इलेक्ट्रीकल साहित्य खरेदी व इतर खर्चासाठी ५0 लाख रुपयांची मागणी केली.
मागणीप्रमाणे संस्थेच्या देना बँकेतील कर्जखात्यातून ५0 लाखांचा धनादेश २0 डिसेंबर २0१२ रोजी अभिजित यादव यास देण्यात आला. पण धनादेश वठल्यानंतरही कामाला सुरुवात झाली नाही. ७—८ महिने होऊनही अभिजित यादव उडवाउडवीची उत्तरे देत होता. संस्थेचे संचालक त्याला घरी भेटण्यास गेल्यानंतर, त्याचा भाऊ अनिरुध्द व वडील रमेश यादव यांनी त्यांना कोल्हापूरच्या गुंडांकडून हिसका दाखवू, अशी धमकी दिली. तपास पोलीस निरीक्षक रमेश बनकर करीत आहेत. (वार्ताहर)