एलबीटीचे ५० कोटी थकले

By Admin | Updated: June 27, 2014 00:44 IST2014-06-27T00:43:02+5:302014-06-27T00:44:59+5:30

अजिज कारचे : व्यापाऱ्यांकडून वसुली करणारच

50 crores of LBT tired | एलबीटीचे ५० कोटी थकले

एलबीटीचे ५० कोटी थकले

सांगली : महापालिका हद्दीतील एलबीटीपोटी ग्राहकांकडून गोळा केलेली सुमारे ५० कोटींहून अधिक रक्कम व्यापाऱ्यांकडे थकित आहे. या रकमेची वसुली केली जाईल, असे आयुक्त अजिज कारचे यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास (आरटीओ) आपटा पोलीस चौकीजवळील शाळा क्रमांक आठची जागा देण्यासही त्यांनी सहमती दर्शविली.
आयुक्त कारचे यांनी आज वीज मंडळ, आरटीओंशी संबंधित प्रश्नांवर बैठक घेतली. यावेळी उपप्रादेशिक अधिकारी हरिश्चंद्र गडसिंग, वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता कागे, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक प्रशांत पाटील, सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे उपस्थित होते.
एलबीटीबाबत भूूमिका मांडताना कारचे म्हणाले की, एलबीटी वसुलीबाबत महापालिकेची सर्वच पर्यायांबाबत तयारी आहे. सध्या शासनस्तरावर निर्णय प्रलंबित असला तरी, एलबीटीची वसुली थांबलेली नाही. जून महिन्यात चार कोटी ९० लाख रुपयांचा कर वसूल झाला आहे. गेल्या वर्षभरात व्यापाऱ्यांनी ग्राहकांकडून एलबीटी वसूल केला आहे. पण तो महापालिकेकडे भरलेला नाही. भविष्यात या रकमेची वसुली होणार आहे. सुमारे ५० कोटींहून अधिक रक्कम व्यापाऱ्यांनी गोळा केली आहे, असेही ते म्हणाले.
आरटीओ कार्यालयाने आपटा पोलीस चौकीजवळील शाळा क्रमांक आठची जागा तात्पुरत्या स्वरुपात देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यादृष्टीने जागेची पाहणी करण्यात आली आहे. आरटीओ कार्यालयातील कर्मचारी व तेथील खोकीधारकांचे स्थलांतर केले जाणार आहे. पण त्यासाठी वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली आहे, असेही कारचे यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या एक्स्प्रेस फिडरला थेट वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र केबल टाकण्याचे निर्देश वीज मंडळाला दिले आहेत. त्यांनीही त्याला सहमती दर्शविली आहे. मंगळवारी वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्यानंतर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 50 crores of LBT tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.