गोदाम, शीतगृह उभारणीसाठी ५० टक्के अनुदान देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:46 IST2021-02-06T04:46:45+5:302021-02-06T04:46:45+5:30

जत : राज्यातील शेतकऱ्यांना गोदाम आणि शीतगृह उभारणीसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे थकीत अनुदानही तात्काळ देण्यात ...

50 per cent subsidy for construction of warehouse and cold storage | गोदाम, शीतगृह उभारणीसाठी ५० टक्के अनुदान देणार

गोदाम, शीतगृह उभारणीसाठी ५० टक्के अनुदान देणार

जत : राज्यातील शेतकऱ्यांना गोदाम आणि शीतगृह उभारणीसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे थकीत अनुदानही तात्काळ देण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी येथे केली.

येथील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलाचे ‘कीर्ती मालिनीराजे डफळे संकुल’ असे नामकरण झाले. यावेळी कृषिमंत्री भुसे बोलत होते. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

भुसे म्हणाले की, देशातील शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत, ही शोकांतिका आहे. राज्यातील कोणत्याही तालुक्यात भविष्यात दुष्काळी परिस्थिती राहणार नाही, असा निर्धार शासनाने केला आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम दिला आहे. राज्यात एक कोटी ५४ लाख खातेदार शेतकरी असून, त्यांना खते, बी-बियाणे कमी पडू दिले जाणार नाही. सुमारे दोन लाख टन खताचा बफर स्टॉक केला आहे. भविष्यात कोणत्याही खताची टंचाई होणार नाही.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, दिवंगत पतंगराव कदम यांचे अपूर्ण काम विश्वजित कदम पूर्ण करत आहेत. भारती विद्यापीठाचे कार्य आणखी विकसित व्हावे.

विश्वजित कदम म्हणाले की, दिवंगत पतंगराव कदम यांनी जत तालुक्यात पाणी आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. भारती विद्यापीठ संकुलातर्फे वेगवेगळे अभ्यासक्रम व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. मागील ५० वर्षांचे जत तालुक्याचे पाण्याचे स्वप्न येत्या चार वर्षांत पूर्ण करू.

आमदार सावंत म्हणाले की, तालुक्यात पाणी आल्याशिवाय येथील विकास व सुधारणा होणार नाहीत. शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून येथे वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

प्राचार्य डी. जी. कणसे यांनी स्वागत केले. यावेळी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, माजी आमदार उमाजी सनमडीकर, महेंद्र लाड, डॉ. हणमंतराव कदम, इंद्रजितराजे डफळे, ज्योत्स्नाराजे डफळे, शार्दुलराजे डफळे, बाबासाहेब कोडग, आप्पासाहेब बिराजदार, परशुराम मोरे, अशोक बन्नेनवार, सुजय शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: 50 per cent subsidy for construction of warehouse and cold storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.