क्रीडा संकुलातील डेडिकेटेड सेंटरमधून ४५० रुग्ण बरे झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:26 IST2021-05-23T04:26:18+5:302021-05-23T04:26:18+5:30
जिल्हा क्रीडा संकुलातील सुसज्ज डेडिकेटेड कोविड केअर सेंटर लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : क्रीडा संकुलात शासनाने सुरू केलेले डेडिकेटेड ...

क्रीडा संकुलातील डेडिकेटेड सेंटरमधून ४५० रुग्ण बरे झाले
जिल्हा क्रीडा संकुलातील सुसज्ज डेडिकेटेड कोविड केअर सेंटर
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : क्रीडा संकुलात शासनाने सुरू केलेले डेडिकेटेड कोविड सेंटर रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. महिन्याभरात ६०० रुग्णांना दाखल करण्यात आले, त्यापैकी ४५० रुग्ण बरे होऊन बाहेर पडले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी माहिती दिली की, ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या संख्येने या सेंटरमध्ये दाखल होत आहेत. येथे १५६ बेड असून त्यातील १३४ बेडना ऑक्सिजनची सोय आहे. ऑक्सिजनच्या साठ्यासाठी स्वतंत्र टाक्या बसवल्या आहेत, त्यामुळे तुटवडा निर्माण होत नाही. पाइपद्वारे प्रत्येक बेडला ऑक्सिजन पुरवठा केला आहे. पहिल्या लाटेत सुरू केलेल्या सेंटरचा खऱ्या अर्थाने जास्त वापर दुसऱ्या लाटेत होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली सेंटर सुरू झाले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांच्या नियंत्रणाखाली सध्या कामकाज सुरू आहे.
केंद्रात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी असा ४० जणांचा स्टाफ तीन सत्रांत काम करत आहे. १५ एप्रिल ते २० मे या कालावधीत ६०० रुग्ण भरती झाले. उपचारांनंतर ४५० रुग्ण बरे होऊन घरी परतले. रुग्णांना दररोज पौष्टिक आहार, चहा, अल्पोपाहार दिला जातो. रुग्णाचे नातेवाईक सीसीटीव्हीद्वारे रुग्णांशी संवाद साधू शकतात. रुग्णांची ने-आण करण्यासाठी ४ रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध ठेवल्या आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी कामकाजाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.