सांगली, मिरजेत ४५ कोटींची कामे ठप्प
By Admin | Updated: September 13, 2014 00:15 IST2014-09-13T00:10:59+5:302014-09-13T00:15:00+5:30
निवडणूक आचारसंहिता : महापालिका, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची वाहने ताब्यात

सांगली, मिरजेत ४५ कोटींची कामे ठप्प
सांगली : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेच्या सुमारे ४५ कोटीच्या कामांना ब्रेक लागणार आहे, तर चार ते पाच कोटीची कामे सुरू राहणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. दरम्यान, महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी आपली वाहने व मोबाईल सीम कार्ड प्रशासनाकडे जमा केले. सायंकाळनंतर प्रशासनाने डिजिटल हटाव मोहीम हाती घेण्यात आली असून ५० हून अधिक फलक काढण्यात आले.
विधानसभा निवडणुकीसाठी सायंकाळी आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर महापौर कांचन कांबळे, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी आपली वाहने प्रशासनाकडे जमा केली. महापौर कांबळे स्वत:च्या वाहनातून घरी परतल्या. उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर यांनी चार दिवसांपूर्वीच वाहन जमा केले होते, तर गटनेते किशोर जामदार यांचे वाहन नादुरुस्त असल्याने त्यांचे वाहन कार्यशाळेतच आहे. सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपली मोबाईल सीम कार्डही जमा केली.
महापालिकेने गेल्या महिन्याभरात ५० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली होती. त्यातील चार ते पाच कोटीच्या कामांना सुरूवात झाली आहे. त्यात गटारी, रस्ते मुरूमीकरण, खडीकरण, पाईपलाईन टाकणे या कामांचा समावेश आहे. आचारसंहितेमुळे सुरू न झालेल्या कामांना ब्रेक लागणार आहे, तर सुरू असलेली कामे पूर्ण केली जाणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. आयुक्त अजिज कारचे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. शहरातील राजकीय पक्षांचे फलक हटविण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने फलक हटाव मोहीम घेतली आहे. रात्री उशिरापर्यंत पथकाचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)