जिल्ह्यातील ४४,२७० शेतकरी वीज बिलातून थकबाकीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST2021-08-29T04:26:37+5:302021-08-29T04:26:37+5:30
सांगली : महावितरण कंपनीने कृषिपंपाच्या जुन्या थकबाकीमध्ये ६६ टक्के सूट दिली असून उर्वरित थकबाकीपैकी ५० टक्के मार्चपर्यंत भरल्यास शिल्लक ...

जिल्ह्यातील ४४,२७० शेतकरी वीज बिलातून थकबाकीमुक्त
सांगली : महावितरण कंपनीने कृषिपंपाच्या जुन्या थकबाकीमध्ये ६६ टक्के सूट दिली असून उर्वरित थकबाकीपैकी ५० टक्के मार्चपर्यंत भरल्यास शिल्लक ५० टक्के थकबाकी माफ करण्याची योजना शासनाने आणली. यामुळे जिल्ह्यातील ४४ हजार २७० शेतकरी वीजबिलाच्या थकबाकीतून मुक्त झाले आहेत.
राज्य शासनाने कृषिपंपाच्या वीज बिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी विशेष योजना आणली होती. जुन्या थकबाकीमध्ये ६६ टक्के सूट दिली आहे. शिल्लक थकबाकीपैकी ५० टक्के थकबाकी मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी माफ होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४४ हजार २७० शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला. यामध्ये त्यांनी थकबाकीपोटी ५७ कोटी ३३ लाख व चालू वीज बिलांच्या ४९ कोटी ९० लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे त्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट दिली आहे. विलंब आकार व व्याजातील सूट असे एकूण ८९ कोटी ८ लाख रुपये माफ झाले आहेत. २२,४६९ शेतकरी वीज बिलांमधून पूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीज बिलासह थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा एकूण ६४ कोटी ५१ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी ४४ कोटी ७५ लाख रुपयांची सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.
जिल्ह्यातील एकूण दोन लाख ३९ हजार १६६ शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त होण्याची संधी आहे. महावितरणकडून मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी रक्कम वगळून त्यांच्याकडे १०४३ कोटी ५८ लाख सुधारित थकबाकी आहे. यातील ५० टक्के थकबाकी तसेच चालू वीजबिलांचे २२९ कोटी ३१ लाख रुपयांचा भरणा येत्या मार्चपर्यंत केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के रक्कम माफ होणार आहे.
चौकट
बिलातील ६६ टक्के रक्कम पायाभूत विकासासाठी
थकीत व चालू बिलांच्या रकमेतील ६६ टक्के रक्कम ग्रामपंचायत व जिल्ह्यातील ग्रामीण वीज वितरण यंत्रणेच्या पायाभूत विकासासाठी खर्च करण्यात येत आहे, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांनी दिली.