जिल्ह्यातील ४४० पोलिसांच्या बदल्या!
By Admin | Updated: June 3, 2015 01:01 IST2015-06-03T00:11:43+5:302015-06-03T01:01:15+5:30
अखेर गॅझेट फुटले : मुलाखती नाहीत; अर्जावरून पार पडली प्रक्रिया

जिल्ह्यातील ४४० पोलिसांच्या बदल्या!
सांगली : गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेले जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे ‘गॅझेट’ अखेर सोमवारी फुटले. एकाही कर्मचाऱ्याचे म्हणणे ऐकून न घेता बदल्या करण्यात आल्या आहेत. तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी बदलीच्या कक्षेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवून घेतले होते. मात्र त्यांची बदली झाल्याने कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया रखडली होती. याच अर्जांच्या आधारे सोमवारी काही तासातच ४४० कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या.
पोलीस ठाण्यात पाच वर्षे व विभागात १२ वर्षाचा कार्यकाल पूर्ण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रत्येकवर्षी बदल्या केल्या जातात. कर्मचाऱ्यांना बदलीचे ठिकाण समजावे, त्यांना राहण्याची व्यवस्था व मुलांचा शाळा प्रवेश या प्रक्रिया करण्यास वेळ मिळावा, यासाठी बदल्यांची ही प्रक्रिया १५ मेपर्यंत राबविली जाते. यावर्षी बदलीच्या कक्षेत ४४० कर्मचारी होते. या सर्वांना सध्या नेमणुकीचे ठिकाण, बदली कोठे हवी व अन्य कामकाज याची सर्व माहिती तत्कालीन पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी मागविली होती. त्यानंतर ते कर्मचाऱ्यांशी संवाद साधून बदल्या करणार होते. मात्र तोपर्यंत त्यांचीच मुंबईला बदली. त्यामुळे बदल्यांची प्रक्रिया रखडली होती. बदली कोठे होणार, अशी कर्मचाऱ्यांना धाकधुक लागून राहिली होती. अखेर सोमवारी बदल्यांचे ‘गॅझेट’ फुटले. अचानक गॅझेट फुटल्याने सर्वांनाच धक्का बसला.
बदली झालेल्यांमध्ये सहायक पोलीस फौजदार ५७, हवालदार १३१, नाईक १२७ व शिपाई १२५ अशा ४४० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी सध्या जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात सेवा बजावत आहेत. पोलीस ठाण्यात पाच वर्षे असलेले, ज्यांचे सेवानिवृत्तीचे केवळ एक वर्ष राहिले आहे, वैद्यकीय कारण व पती-पत्नी शासकीय नोकरीत आहेत, असे चार निकष या बदल्यांमागे लावण्यात आले आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने सध्याचे ठिकाण सोडण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने आता जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांचाही खांदेपालट होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांत नाराजी
बदलीच्या कक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. केवळ त्यांनी दिलेल्या अर्जाच्याआधारे ही प्रक्रिया राबविण्यात आली. प्रत्येकवर्षी पाच ते सहा दिवस ही प्रक्रिया सुरू असे. यावर्षी मात्र काही तासातच बदल्या झाल्या. पसंतीचे पोलीस ठाणे न मिळाल्याने अनेक कर्मचारी नाराज झाले आहेत.