जिल्ह्यात ३ वर्षांत ४४ मुलांचे अपहरण
By Admin | Updated: January 26, 2015 00:37 IST2015-01-26T00:33:17+5:302015-01-26T00:37:03+5:30
गतीने तपास : स्वतंत्र पोलीस पथकाची नियुक्ती; बेपत्तावरून गुन्हे दाखल

जिल्ह्यात ३ वर्षांत ४४ मुलांचे अपहरण
सचिन लाड / सांगली
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलांच्या प्रकरणात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. जिल्ह्यातील २४ पोलीस ठाण्यात आतापर्यंत ४४ मुलांचे अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अपहरण प्रकरणाचा तपास तातडीने होण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.
गेल्या काही वर्षांत अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलांपेक्षा मुली बेपत्ता होण्याची संख्या मोठी आहे. काही मुले अभ्यास न केल्याने, आई, वडील रागावल्यामुळे बेपत्ता होतात. मुलींना लग्नाच्या आमिषाने पळविले जाते. मात्र सुरुवातीला ही मुले बेपत्ता असल्याची नोंद केली जाते. पोलिसांकडून या मुलांचे छायाचित्र व माहिती राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना कळविली जाते. चार-आठ दिवस गतीने तपास केला जातो. परंतु कुठेच सुगावा लागत नसल्याचे लक्षात येताच पोलीस तपास थांबतो. त्यानंतर पालक स्वत: मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे हे प्रयत्न अपुरे पडतात. मुले बेपत्ता होणे आणि ती न सापडणे, हा विषय पालकांच्यादृष्टीने चिंतेचा बनला आहे. पालक चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तपास अधिकारी फारशी दखल घेत नाहीत. काय कुठं सुगावा लागला का? असा पालकांनाच प्रश्न विचारतात.
सहा महिन्यांतून एकदा पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून या मुलांचे काय झाले? ती सापडली का? याची पोलिसांकडून चौकशी केली जाते. यासंदर्भात जबाबही नोंदवून घेतला जातो. मुलांपेक्षा मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे. तीन-तीन वर्षे होऊन गेली तरी, मुली सापडत नसल्याने पालकांना चिंता लागून राहिली आहे. त्यांचा पोलीस तपासावरील विश्वास उडून गेला आहे. पोलीस मात्र लग्नाच्या आमिषाने पळून गेली आहे, म्हणजे तिचं त्या मुलाबरोबर प्रेमप्रकरण होतं, आज ना उद्या ती येईल, असे सांगून पालकांना पिटाळून लावतात. यामुळे वर्षानुवर्षे या मुलींचा तपास लागत नाही. या मुली जिवंत आहे का नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पळवून नेणारे ‘आॅनरेकॉर्ड’
लग्नाच्या आमिषाने मुलींना पळवून नेले जाते. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होते; मात्र मुलींना पळवून नेणारे तरुण बेपत्ता आहेत, म्हणून त्यांची तक्रार दाखल होताना दिसत नाही. तरुणांचे नातेवाईक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. यावरून त्यांना हा तरुण कुठे आहे, याची माहिती असावी, हे स्पष्ट होते. पोलिसांनी याचा विचार करून त्यादृष्टीने तपास करण्याची गरज आहे.
पित्यांच्या डोळ्यात अश्रू!
सहा महिन्यांतून एकदा पोलीस मुलींच्या पित्यांना जबाब घेण्यासाठी तपास करणारे पोलीस कर्मचारी ठाण्यात बोलावून घेतात. साहेबांसमोर त्यांना हजर करतात. त्यावेळी साहेब या पित्याला, काय झालं मुलीचं? याची चौकशी करतात. त्यावेळी पित्याच्या डोळ्यात अश्रू उभारत आहेत. ‘साहेब मी नाद सोडला आहे. मुलीला शोधताना मी कर्जबाजारी झालो आहे? आता तिला शोधा, नाही तर राहू दे’, असे उत्तर ते देतात.
बेपत्तावरून आता अपहरण
पूर्वी अल्पवयीन मुले घरातून निघून गेल्यानंतर पोलीस बेपत्ताची नोंद करून घेत होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून १ ते १७ वयोगटातील मुलगा किंवा मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आली तर, पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याची नवीन नियमावली अमलात आली आहे. पूर्वी ज्या अल्पवयीन मुला-मुलींची बेपत्ताची नोंद आहे, यामध्ये आता पालकांना बोलावून त्यांची तक्रार घेऊन अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आतापर्यंत अपहरणाचे ४४ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये २४ मुली, तर २० मुलांचा समावेश आहे.