पेठ येथे जमीन व्यवहारातून महिलेची ४१ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:13+5:302021-04-27T04:28:13+5:30

इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) गावच्या हद्दीतील ३ गुंठे शेतजमीन खरेदी करून त्यापोटी ठरलेली ४१ लाख ५० हजार ...

41 lakh fraud from a woman in a land transaction at Peth | पेठ येथे जमीन व्यवहारातून महिलेची ४१ लाखांची फसवणूक

पेठ येथे जमीन व्यवहारातून महिलेची ४१ लाखांची फसवणूक

इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) गावच्या हद्दीतील ३ गुंठे शेतजमीन खरेदी करून त्यापोटी ठरलेली ४१ लाख ५० हजार रुपयांची रोकड न देता जमीन मालकाची फसवणूक करणाऱ्या एका विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. विजय विलास माने (रा. इस्लामपूर) असे फसवणूक करणाऱ्याचे नाव आहे. फसवणुकीचा हा प्रकार सहा वर्षांपूर्वी घडला आहे.

याप्रकरणी शोभा अशोक पाटील (रा. पेठनाका) यांनी साेमवारी पोलिसात फिर्याद दिली आहे. २२ जानेवारी २०१५ रोजी विजय माने याने शोभा पाटील यांची तीन गुंठे जमीन खरेदीचा करार केला होता. ४१ लाख ५० हजार रुपयांचा हा करार होता. करार करताना माने याने १ लाख ५० हजार रुपये शोभा पाटील यांना दिले होते. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी ३ लाख रुपये देऊन राहिलेली ३७ लाख रुपयांची रक्कम खरेदी करतेवेळी देण्याचे ठरले होते. या व्यवहारासाठी तीन महिन्यांची मुदत घालून देण्यात आलेली होती.

त्यानंतर १ जून १५ रोजी शोभा पाटील यांनी विजय विलास माने याला सर्व्हे नं. ३७७/२ मधील ३ गुंठे जागा खरेदी दस्ताद्वारे दिली. व्यवहारावेळी उर्वरित रक्कम केव्हा देणार असे विचारले असता माने हा आज देतो, उद्या देतो असे म्हणत होता. पैशासाठी तगादा लावल्यावर माने याने पैसे देणार नाही. तुम्हांला काय करायचे ते करा. पोलीस व कोर्ट माझ्या हातात आहेत. तुम्हाला जिवंत सोडत नाही. असे कित्येक व्यवहार जिरविले आहेत, अशी धमकी दिली. त्यामुळे पाटील यांनी त्याच्याकडे रक्कम मागणे बंद केले. या दरम्यानच्या काळात विजय माने याने पाटील यांची खरेदी घेतलेली तीन गुंठे जमीन व पोटखराब हिश्यातील ११९ चौ. मी. क्षेत्र तसेच आणखी सव्वा गुंठे क्षेत्र असे मिळून ५.४२ आर क्षेत्र व पोटखराबा १.२३ क्षेत्र पत्नी प्रियांका विजय माने हिच्या नावाने बक्षीस पत्राने नोंद घातली. हा प्रकार फिर्यादी शोभा पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली.

चौकट

फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित विजय विलास माने याने आणखी कोणाची फसवणूक केली असेल. तसेच अशा व्यवहारापोटी कोणाला त्रास दिला असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून आपली तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केले आहे.

Web Title: 41 lakh fraud from a woman in a land transaction at Peth