जिल्ह्यासाठी ४०० कोटींची मागणी
By Admin | Updated: November 17, 2016 23:27 IST2016-11-17T23:27:43+5:302016-11-17T23:27:43+5:30
दररोज ५० कोटींच्या जुन्या नोटा जमा : शहरातील बँका, पोस्टासमोरील गर्दी ओसरू लागली

जिल्ह्यासाठी ४०० कोटींची मागणी
सांगली : केंद्र सरकारच्या नोटा बंदच्या निर्णयाला दहा दिवसांचा कालावधी होऊनही, बहुतांशी एटीएम यंत्रणा कोलमडली असून, बॅँकांबाहेरील गर्दीही कायम आहे. पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंदमुळे चलन तुटवड्याची निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्याला ४०० कोटींची मागणी करण्यात आली आहे. पेट्रोलपंप, रुग्णालय यासह अत्यावश्यक सेवेसाठी जुन्या चलनास मुदतवाढ देण्यात आल्याने शहरातील बॅँका व पोस्टाबाहेरील गर्दी आता ओसरू लागली आहे.
दरम्यान, चलनातून बाद केलेल्या पाचशे व हजार रूपयांच्या ५० कोटी रूपयांच्या नोटा दररोज संकलित होत आहेत. त्याबदल्यात पुरवठा होणारी रक्कम खूप कमी आहे. त्यात नवीन पाचशेची नोट अजूनही सांगलीत उपलब्ध झालेली नाही. (प्रतिनिधी)
ग्राहकांचे सहकार्य हवे...
नागरिकांनी कोणत्याही अफ वेवर विश्वास न ठेवता, भीती न बाळगता गरजेएवढीच रक्कम बाळगावी. शक्य तिथे आॅनलाईन पेमेंट, डेबिट कार्ड सेवेचा वापर करावा. बॅँक कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ग्राहकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा बॅँक कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कट्टी यांनी केले आहे.
रात्रीचा दिवस
बॅँकेबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा आणि चलनाचा कमी पुरवठा असतानाही, ग्राहकांना सेवा देण्यासाठी बॅँक कर्मचारी जादा वेळ काम करत आहेत. गुरूवारपासून रात्री बारापर्यंत कर्मचारी बॅँकेतच थांबून काम करत असल्याने, चलन तुटवड्याची परिस्थिती आटोक्यात येण्यास मदत होत आहे.
बँक अधिकाऱ्यांना मिळाले रात्री एक वाजता जेवण
गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्वच बॅँकांतील कर्मचारी, अधिकारी रात्री उशिरापर्यंत थांबून काम पूर्ण करत आहेत. मंगळवारी शहरातील एका बॅँकेतील परप्रांतीय अधिकाऱ्यांचे रात्री एकपर्यंत काम सुरू होते. एवढ्या रात्री त्यांना जेवण मिळणे अशक्यच होते. तरीही एका हॉटेलमध्ये चौकशी केल्यानंतर, तेथील चालकाने, ‘हॉटेल बंद झाले आहे, तरीही तुम्ही एवढ्या रात्रीपर्यंत आमच्यासाठी काम करत आहात, तर जेवण देणे माझे कर्तव्य बनते’, असे म्हणत या अधिकाऱ्यांना जेवण तयार करून दिले. विशेष म्हणजे त्यानंतर त्या हॉटेल चालकाने या अधिकाऱ्यांचे बिलही घेतले नाही.