सांगली : बचतगटाने घेतलेल्या टेंडरचे बिल मंजूर केल्याबद्दल ४० हजार रूपयांची लाच घेतल्याबद्दल समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त नितीन उषा संपत उबाळे (वय ४६, रा. खरे क्लब हाऊसजवळ, विश्रामबाग, सांगली. मूळ रा. साखरवाडी, ता. फलटण) याला अटक केली. सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उबाळे याच्या कक्षात ही कारवाई केली.तक्रारदार यांचा बचतगट आहे. या बचतगटाने समाज कल्याण विभागाकडील एक टेंडर घेतले होते. काम पूर्ण झाल्यानंतर बिल मंजूर केल्याबद्दल सहायक आयुक्त उबाळे याने तक्रारदार यांच्याकडे १० टक्केप्रमाणे लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी दि. १६ रोजी तक्रार अर्ज दिला.तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. तेव्हा तक्रारदार यांच्या बचतगटाचे ८ लाख १२ हजार रूपये बिल मंजूर केल्याबद्दल दहा टक्केप्रमाणे लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोड करून पाच टक्के प्रमाणे ४० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. तसेच उबाळे याने लाचेची रक्कम दि. १७ रोजी घेऊन येण्यास सांगितले.
गुरूवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक आयुक्त उबाळे याच्या कक्षाजवळ सापळा रचला. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडून ४० हजार रूपये लाच स्विकारल्यानंतर उबाळे याला अटक करण्यात आली. त्याच्याविरूद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार सायंकाळी उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला. लाचखोर उबाळे याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक किशोरकुमार खाडे, विनायक भिलारे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, धनंजय खाडे, सीमा माने, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, वीणा जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गतवर्षीही झाली होती कारवाईसांगलीत गतवर्षी समाज कल्याणमधील अतिरिक्त सहायक संचालक सपना घोळवे यांना एक लाखाची लाच घेतल्याबद्दल अटक केली होती. त्यानंतर सहायक आयुक्त उबाळे याच्यावर कारवाई करण्यात आली.