जबाबदारी घेण्यास कर्मचाऱ्याला ४० लाखांची ‘आॅफर’ !
By Admin | Updated: December 16, 2015 00:13 IST2015-12-15T23:50:46+5:302015-12-16T00:13:06+5:30
--पेपरफुटी प्रकरण

जबाबदारी घेण्यास कर्मचाऱ्याला ४० लाखांची ‘आॅफर’ !
सांगली : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य सेविका भरतीमधील पेपरफुटी प्रकरणात अनेक कर्मचाऱ्यांसह काही अधिकाऱ्यांचाही सहभागी असल्याची चर्चा रंगली आहे. या प्रकरणातून बड्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुद्रणालयातील एका कर्मचाऱ्यास चाळीस लाखांचे आमिष दाखवून त्याच्यावर जबाबदारी टाकण्यासाठी दोषींनी फल्डिंग लावली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे जिल्हा परिषद प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.
पंधरवड्यापूर्वी पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी दोन आरोग्य सेविका महिलांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून अनेक संशयितांची नावे निष्पन्न होत गेली. हे संशयित जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत डझनभर अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी झाली आहे. जे दोषी आहेत, त्यांच्याविरुद्ध भक्कम पुरावेही गोळा करण्यात आले आहे. परीक्षेला बसलेले जे उमेदवार पेपरफुटी ‘रॅकेट’च्या संपर्कात आले होते, त्यांचीही नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांच्याकडे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.
यामध्ये जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांचा हात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हे प्रकरण अंगाशी येणार असल्याने अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मुद्रणालयातील एका कर्मचाऱ्यावर याची जबाबदारी टाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या कर्मचाऱ्याशी आर्थिक तडजोडीतून चर्चा चालू आहे. मुद्रणालयातील कर्मचाऱ्याने पेपर फोडल्याची जबाबदारी घ्यायची आणि त्या मोबदल्यात त्यास चाळीस लाखांपर्यंतची रक्कम देण्याच्या हालचाली चालू असून यास तो कर्मचारीही तयार झाल्याची चर्चा आहे. परंतु, मुद्रणालयाशी संबंधित काही वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत ही चर्चा पोहोचल्याने त्यांनी काही कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. पैशासाठी जिल्हा परिषद मुद्रणालयाची बदनामी करू नका, असेही त्यांना खडसावल्याची चर्चा आहे. या गंभीर प्रकरणात राज्य शासनाने आणि आमदारांनी लक्ष घालण्याची गरज आहे. कर्मचाऱ्याचा बळी देऊन पेपरफुटीचे रॅकेट दडपले जाण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)