पाच्छापूरमध्ये ४० लाखांचा गांजा जप्त

By Admin | Updated: September 17, 2015 00:52 IST2015-09-17T00:47:37+5:302015-09-17T00:52:18+5:30

जत पोलिसांची कारवाई : एकास अटक; उर्वरित संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरु

40 lakhs of Ganja seized in Pachhapur | पाच्छापूरमध्ये ४० लाखांचा गांजा जप्त

पाच्छापूरमध्ये ४० लाखांचा गांजा जप्त

जत : तालुक्यातील पाच्छापूर येथील ज्ञानोबा सखाराम जाधव (वय ६०) याच्या उसाच्या शेतातील तयार गांजाची ३९५ झाडे जत पोलिसांनी बुधवारी जप्त केली. या गांजाची किंमत सुमारे चाळीस लाख रुपये असून त्याचे वजन ३९५ किलो आहे. ही कारवाई सकाळी नऊच्या दरम्यान करण्यात आली. ज्ञानोबा जाधव याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाच्छापूर येथील ज्ञानोबा जाधव याने उसाच्या शेतात गांजाची लागण केली असून, सात ते आठ फूट उंचीची ही झाडे आहेत, अशी माहिती खबऱ्याकडून जत पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी बुधवारी सकाळी छापा टाकून कारवाई केली. जाधव गांजाची लागण करून त्याची विक्री करत असावा, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जाधव याने आजपर्यंत कोणत्या ठिकाणी गांजा विकला आहे, गांजा खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे व्यापारी कोठून येत होते, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकारांना सांगितले.
पाच्छापूर येथे सकाळी छापा घातल्यानंतर सात-आठ पोलीस कर्मचारी दुपारपर्यंत गांजाची झाडे काढण्याचे काम करीत होते. तेथून दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान एका ट्रॅक्टरमध्ये सर्व गांजाची झाडे भरून पोलीस बंदोबस्तात जत येथे आणण्यात आली. रस्त्यावरून गांजा भरून ट्रॅक्टर येत असताना जत शहरातील नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती.
या कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, पोलीस कर्मचारी ए. बी. सूर्यवंशी, विलास मोहिते, यु. एस. फकीर, के. एस. खोत, एस. टी. कांबळे, व्ही. बी. पाटील, डी. के. ठोंबरे, एम. एल. गंभिरे, सतीश माने, अनिल भोसले, संतोष घाडगे, एम. एस. सावंत, सुशांत शिंदे, शिवाजी कोकाटे, नागेश खरात यांनी भाग घेतला होता. या परिसरात आणखी गांजाची झाडे असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)
गांजाची झाडे काढण्यात पोलीस व्यस्त
पाच्छापूर येथे सकाळी गांजाच्या शेतीवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी गांजाची सर्वाधिक झाडे असल्याने पोलीस सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत काढण्यामध्ये व्यस्थ होते.
एका ट्रॅक्टरमध्ये सर्व गांजाची झाडे भरून पोलीस बंदोबस्तात जत येथे आणण्यात आली. जत शहरात ट्रॅक्टर आल्यानंतर बघ्याची मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती. पोलिसांनी ज्ञानोबा जाधव याला अटक केली असून, उर्वरितांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: 40 lakhs of Ganja seized in Pachhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.