अभय योजनेतून घरपट्टीची चार कोटीची सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:16 IST2021-03-30T04:16:41+5:302021-03-30T04:16:41+5:30
सांगली : महापालिकेच्या घरपट्टी विभागाने कोरोनाच्या संकटातही ४३ कोटी ८७ लाख रुपयांची वसुली केली असून ३० हजार मालमत्ताधारकांनी अभय ...

अभय योजनेतून घरपट्टीची चार कोटीची सवलत
सांगली : महापालिकेच्या घरपट्टी विभागाने कोरोनाच्या संकटातही ४३ कोटी ८७ लाख रुपयांची वसुली केली असून ३० हजार मालमत्ताधारकांनी अभय योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेतून चार कोटीची सवलत मालमत्ताधारकांना देण्यात आली आहे.
घरपट्टी विभागाकडे थकीत ४८ कोटी ७२ हजार, तर चालू मागणी ४२ कोटी १५ लाख अशी ९० कोटी ८८ हजार रुपयांची येणेबाकी होती. त्यापैकी ३७ कोटी २२ लाख रुपयांची वसुली झाली आहेत. त्यात थकबाकीचे १२ कोटी ३५ लाख, तर चालू मागणीचे २४ कोटी ८६ लाख रुपयांचा समावेश आहे. नागरिकांनी घनकचरा व्यवस्थापनापोटी उपयोगकर्ता कराला विरोध केला होता. तरीही हा कर भरण्यासही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. उपयोगकर्ता करापोटी ६ कोटी ६४ लाख रुपयांची वसुली झाली आहे.
घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने दंड व शास्ती माफ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे वसुलीला गती आली. १५ फेब्रुवारीपासून ही योजना लागू झाली. तेव्हापासून आतापर्यंत १५ कोटी ५१ लाख रुपयांची वसुली झाली आहे. ३० हजार ७१ नागरिकांनी योजनेचा लाभ घेतला. त्यात ४ कोटी ४ लाख रुपयांची सवलत देण्यात आल्याचे करनिर्धारक व संकलक नितीन शिंदे यांनी सांगितले.
चौकट
मुदतवाढीची मागणी
अभय योजनेत दंड व शास्ती शंभर टक्के माफ केली जात आहे. त्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बँकांना सलग सुट्ट्या असल्याने घरपट्टीच्या वसुलीवर थोडा परिणाम झाला आहे. त्यामुळे अभय योजनेला आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.