रस्त्यांचे भाग्य उजळले ३८ वर्षांनी!
By Admin | Updated: February 7, 2015 00:10 IST2015-02-06T23:25:07+5:302015-02-07T00:10:22+5:30
एमआयडीसीतील मागण्या : चार महिन्यात काम पूर्ण करण्याचे आदेश

रस्त्यांचे भाग्य उजळले ३८ वर्षांनी!
सांगली : मिरज आणि कुपवाड एमआयडीसीमधील चाळण झालेल्या रस्त्यांचे भाग्य तब्बल ३८ वर्षांनी उजाडले आहे. १२ कोटींच्या रस्त्यांची वर्कआॅर्डर पूर्वीच्या निश्चित झालेल्या ठेकेदाराला देण्यात आली. येत्या चार महिन्यात ही सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज, शुक्रवारी दिले. मिरज एमआयडीसीतील २७ किलोमीटरचे आणि कुपवाड एमआयडीसीमधील १२ किलोमीटरचे अंतर्गत रस्ते आता दुरुस्त होणार आहेत. १९७६ नंतर कधीही या रस्त्यांवर डांबर पडले नव्हते. रस्ते व अन्य सुविधांसाठी येथील उद्योजक संघर्ष करीत आहेत. पायाभूत सुविधांसाठी १२ कोटी रुपये तत्कालीन आघाडी सरकारच्या कालावधित मंजूर झाले होते. रितसर निविदा प्रक्रिया पार पाडल्यानंतर ठेकेदारही निश्ंिचत झाला होता. मात्र तांत्रिक गोष्टीत हे काम रखडले होते. तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनीही या कामाबाबत केवळ आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात कामास सुरुवात झालीच नाही. नव्या युती सरकारच्या कालावधित उद्योजकांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले. उद्योगमंत्री देसाई यांनी तीन बैठका झाल्यानंतर प्रत्यक्ष या कामाची वर्कआॅर्डर आज दिली. येत्या चार महिन्यात रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले. कुपवाड एमआयडीसीसाठी ५ कोटी ५0 लाख आणि मिरज एमआयडीसीकरिता ७ कोटी ५0 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रस्त्यांची बहुतांश कामे यात आहेत. १९७६ पासून येथील कर भरणारे उद्योजक पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. (प्रतिनिधी)
बुधवारी उद्घाटन
रस्त्यांच्या या कामाची सुरुवात येत्या ११ फेब्रुवारीरोजी उद्योगमंत्री देसाई यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व युतीचे जिल्ह्याातील आमदार उपस्थित राहणार आहेत. मिरज एमआयडीसीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. बुधवारपासून रस्त्यांच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होईल.
टाऊनशीपबाबत अपेक्षा
टाऊनशीपबाबतही फेरप्रस्ताव पाठविण्याची सूचना देसाई यांनी केली होती. त्यानुसार उद्योजकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासह उद्योजकांच्या अन्य प्रश्नांवर देसाई यांच्याकडून महत्त्वाची घोषणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.