खंडेराजुरीत मुलींना जन्म देणाऱ्या ३८ मातांचा सन्मान
By Admin | Updated: February 6, 2015 00:38 IST2015-02-05T23:52:54+5:302015-02-06T00:38:58+5:30
ग्रामपंचायतीचा उपक्रम : प्रत्येकी पाचशे रुपयांची मदत

खंडेराजुरीत मुलींना जन्म देणाऱ्या ३८ मातांचा सन्मान
मालगाव : खंडेराजुरी (ता. मिरज) ग्रामपंचायतीच्यावतीने मुलीला जन्म देणाऱ्या ३८ मातांचा ५०० रुपयांची मदत देऊन सन्मान केला. यावेळी गुणवंत विद्यार्थी, व्यसनमुक्त झालेल्यांचाही सत्कार केला.ग्रामपंचायतीने तंटामुक्त ग्राम योजनेत भाग घेतला होता. गाव तंटामुक्त झाल्याने शासनाने ५ लाखांचा गाव विकासासाठी निधीदिला होता. या निधीपैकी ३७ टक्के निधी लाभाच्या स्वरुपात खर्चाची तरतूद असल्याने ग्रामपंचायतीने तंटामुक्त अभियान कालावधित मुलींना जन्म देणाऱ्या मातांना, दारिद्र्यरेषेतील परीक्षेत प्रथम तीन आलेले विद्यार्थी, व्यसनमुक्त झालेले व तंटामुक्तीसाठी पुढाकार घेणाऱ्यांवर वैयक्तिक लाभाच्या स्वरुपात १ लाख ८५ हजार खर्च केले आहेत. मुलींना जन्म देणाऱ्या ३८ मातांना प्रत्येकी ५०० रुपये, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०० रुपये, व्यसनमुक्त झालेल्या आठजणांना प्रत्येकी ३०० रुपये, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १० जणांना ५०० रुपये व गाव तंटामुक्त करण्यात सहभाग असणाऱ्या पाचजणांना ५०० रुपये देऊन ग्रामपंचायतीने सन्मान केला. या लाभाचे वाटप सरपंच किशोर कांबळे, ग्रामविकास अधिकारी सुनील गरंडे, पं. स. सदस्य आबासाहेब चव्हाण, तानाजी पाटील, पंडित रुपनर, बापूसाहेब माणगावकर, लक्ष्मण चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. (वार्ताहर)