गायीच्या पोटातून काढले ३५ किलो प्लास्टिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:24 IST2021-05-22T04:24:48+5:302021-05-22T04:24:48+5:30
सांगली : गायीच्या पोटातून ३५ किलो प्लास्टिक आणि धातूच्या सुमारे किलोभर वस्तू बाहेर काढण्यात आल्या. निवृत्त पशुसंवर्धन सहायक आयुक्त ...

गायीच्या पोटातून काढले ३५ किलो प्लास्टिक
सांगली : गायीच्या पोटातून ३५ किलो प्लास्टिक आणि धातूच्या सुमारे किलोभर वस्तू बाहेर काढण्यात आल्या. निवृत्त पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. प्रमोद दोशी यांनी ही शस्त्रक्रिया केली.
धामणी येथील गोशाळेत सुमारे तासभर शस्त्रक्रिया चालली. या गोशाळेत अनाथ गायी सांभाळल्या जातात. आठवडाभरापूर्वी एका शेतकऱ्याने गाभण गाय आणून सोडली होती. चारच दिवसांत तिने खाणेपिणे सोडल्याने गोशाळेच्या संचालकांनी डॉ. दोशी यांना पाचारण केले. तिची क्ष-किरण तपासणी केली असता पोटात अर्भकासोबतच कचरादेखील दिसला. गुरुवारी तिच्या पोटावर शस्त्रक्रिया करून सुरक्षित प्रसूती करण्यात आली, नंतर पोटातील कचराही काढला.
कचऱ्यात सुमारे ३५ किलो प्लास्टिक पिशव्या निघाल्या. शिवाय लोखंडी टाचण्या, खिळे, नटबोल्ट आणि एक चांदीची अंगठीदेखील निघाली. शस्त्रक्रियेमुळे गायीचा जीव बचावला.
डॉ. दोशी म्हणाले की, प्लास्टिकच्या पिशवीतून कचऱ्यात टाकलेले अन्न प्राणी खातात. ते प्लास्टिकसह पोटात जाते. आठवडाभरापूर्वीच एक गाय या कारणानेच दगावली. तिच्या पोटात सुमारे ८० किलोंहून अधिक प्लास्टिक पिशव्या सापडल्या. नागरिकांनी अन्न टाकताना खबरदारी घेण्याची गरज आहे.