दीड महिन्यात जिल्ह्यातील ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:15 IST2021-03-30T04:15:57+5:302021-03-30T04:15:57+5:30
सांगली : गेल्या दीड महिन्यात सांगली जिल्ह्यात तब्बल ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. याच काळात ...

दीड महिन्यात जिल्ह्यातील ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू
सांगली : गेल्या दीड महिन्यात सांगली जिल्ह्यात तब्बल ३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. याच काळात एकूण रुग्णसंख्येत २ हजार ७०९ जणांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोना जिल्ह्यात पुन्हा हात-पाय पसरत असल्याचे चित्र दिसत आहे.
सांगली जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या गतीने वाढत आहे. दीड महिन्यापूर्वी म्हणजेच १४ फेब्रुवारीस दिवसभरात १३ रुग्ण सापडले होते. २८ मार्च रोजी दिवसभरातील रुग्णसंख्या अडीचशेच्या घरात गेली आहे. दुसरीकडे मृतांचा आकडाही कमी-जास्त होत आहे. दीड महिन्यात उपचार सुरु असताना एकूण ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय परजिल्ह्यातील दोघांचा याच काळात मृत्यू झाला आहे.
नागरिकांमध्ये अद्याप कोरोना नियमांचे पालन करण्याविषयी गांभीर्य दिसत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. सध्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या व बेडची उपलब्धता चिंताजनक स्थितीत नाही. तरीही रुग्णवाढ होऊ नये म्हणून सर्वांनी दक्षता घेण्याची गरज आहे.
चौकट
गृह विलगीकरणातील रुग्णांकडे लक्ष द्या
जिल्ह्यात सध्या गृह विलगीकरणात १ हजार ४५० रुग्ण असून, रुग्णालयातील दाखल रुग्णांची संख्या २८४ इतकी आहे. गृह विलगीकरणातील रुग्ण खुलेआम बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा लोकांमुळे संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे गृह विलगीकरणातील रुग्णांवर लक्ष देण्याची अधिक गरज आहे.
चौकट
आजवरचे एकूण रुग्ण ५०,९८७
बरे झालेले ४७४१२
चौकट
मृत्यूदर ३.५ टक्के
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के
चौकट
विभागनिहाय रुग्ण
ग्रामीण ५१ टक्के
शहरी १५ टक्के
महापालिका ३४ टक्के