३४२ मंडळांचा गणरायाला निरोप!

By Admin | Updated: September 24, 2015 00:02 IST2015-09-23T23:26:30+5:302015-09-24T00:02:55+5:30

सांगली, मिरजेत मिरवणूक : मिरजेत अकराव्या दिवशीच्या विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे

342 Mandalas send a message! | ३४२ मंडळांचा गणरायाला निरोप!

३४२ मंडळांचा गणरायाला निरोप!

सांगली/मिरज : ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ, पुढच्यावर्षी लवकर याऽऽ’च्या जयघोषात सांगली व विश्रामबाग परिसरातील २७७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बुधवारी गणरायाला निरोप दिला. कृष्णा घाटावर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरु होत्या.
सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १०७ मंडळांच्या ‘श्रीं’चे विसर्जन झाले. यापैकी ३८ मंडळांनी मिरवणुकीने गणरायाला निरोप दिला. संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील ८३ मंडळांच्या ‘श्रीं’चे विसर्जन झाले. ३३ मंडळांनी मिरवणूक काढली होती. विश्रामबाग हद्दीतील ८७ मंडळांच्या ‘श्रीं’चे विसर्जन झाले. ४० मंडळांनी मिरवणूक काढली होती. सायंकाळी सहा वाजता मिरवणूक निघाली होती. डॉल्बीचा वापर टाळण्यात आला होता. झांजपथक, बॅन्ड, बँजो व लेझीम या पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यात आला होता. मिरवणूक मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. काही प्रमाणात घरगुती गणपतींचेही आज विसर्जन झाले.
मिरज : मिरजेत बुधवारी ६५ सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गणेश तलावात व कृष्णाघाटावर करण्यात आले. दुपारपासून सुरू झालेल्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. दरम्यान अकराव्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गावर ३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
सार्वजनिक मंडळांनी बॅन्ड, बँजो, झांजपथक, ढोलपथकाच्या तालावर ‘मोरयाऽऽ’च्या गजरात मिरवणुका काढल्या. ५० मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गणेश तलावात, तर १५ मंडळांनी कृष्णा नदीपात्रात मूर्तीचे विसर्जन केले. कृष्णाघाटावर विसर्जनासाठी क्रेन, तराफ्यांची सोय केली होती. तलावात दोन्ही बाजूंनी विसर्जन व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षा उपाययोजना म्हणून अग्निशमन दलाने तलावात यांत्रिक बोटीची व्यवस्था केली होती. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त होता. पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, प्रांताधिकारी सुभाष बोरकर, तहसीलदार किशोर घाडगे, उपायुक्त सुनील नाईक, सहायक आयुक्त टीना गवळी यांच्या पथकाने मिरवणूक मार्गाची पाहणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: 342 Mandalas send a message!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.