लॉकडाऊन काळात देशातील स्टीलच्या दरामध्ये ३४ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST2021-07-12T04:17:13+5:302021-07-12T04:17:13+5:30

अविनाश कोळी सांगली : देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी कायम असताना उत्पादनात झालेली घट, उत्पादन खर्चात होत असलेली वाढ ...

34% increase in steel prices during lockdown | लॉकडाऊन काळात देशातील स्टीलच्या दरामध्ये ३४ टक्के वाढ

लॉकडाऊन काळात देशातील स्टीलच्या दरामध्ये ३४ टक्के वाढ

अविनाश कोळी

सांगली : देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी कायम असताना उत्पादनात झालेली घट, उत्पादन खर्चात होत असलेली वाढ यामुळे स्टीलच्या दरात ३४ टक्के वाढ झाली आहे. भारतात इंधन दरवाढीचाही फटका स्टीलच्या दराला बसला आहे.

स्टीलच्या वाढत्या दरामुळे बांधकाम क्षेत्रासह विविध उद्योगांच्या बजेटला दणका बसला आहे. स्टील उत्पादन करताना बऱ्याच यंत्रांसाठी डिझेलचा वापर होता. उत्पादीत व कच्च्या मालाच्या वाहतुकीलाही इंधन लागते. त्यामुळे इंधन दरवाढीचा सर्वच बाजूंनी स्टीलच्या दराला फटका बसला आहे. उत्पादन खर्चातही वाढ होत आहे. त्यामुळे स्टीलच्या दरवाढीत इंधन दरवाढीने मोठी भर टाकली आहे.

दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्टीलचा वापर वाढला असला तरी उत्पादन घटले आहे. चीनमध्ये सध्या ७० टक्के क्षमतेने स्टील उद्योग सुरु आहेत. इंडियन स्टील असोसिएशनच्या अहवालानुसार, चीनमधील स्टीलचा वापर यावर्षीच्या तिमाहीत ४७ टक्क्यांनी वाढला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीही चीनने उत्पादनात घट करण्यास सुरुवात केली आहे. जपानमध्येही १५.९ टक्के उत्पादन घटले आहे.

भारतात मागील आर्थिक वर्षात १०२ मिलियन टन स्टीलचे उत्पादन झाले होते. यावर्षी ते ९४ मिलियन टनापर्यंत म्हणजेच ७.८ टक्क्यांनी घटण्याची चिन्हे आहेत. निर्यातीत वाढ झाली असून, आयातीत २९.८ टक्के घट दिसत आहे. दुसरीकडे भारतातील वापर व तुलनेने मागणी कायम आहे. त्यामुळे दरवाढ कायम आहे. उत्पादनापासून मालाच्या बाजारपेठेपर्यंतची साखळीही विस्कळीत झाल्याने दरवाढ होत आहे. कोरोनाचा, लॉकडाऊनचा थेट फटका उद्योगांना बसला आहे. कोरोना महामारीची स्थिती अद्याप नियंत्रणात नाही. पुढील काही महिन्यांत आणखी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने स्टीलच्या दरवाढीचे संकटही कायम राहण्याची शक्यता दिसत आहे.

चौकट

अशी झाली दरात वाढ

मार्चपूर्वी स्टेन्लेस स्टीलचा दर सरासरी २०० ते २०५ रुपये प्रतिकिलो होता. तो आता २३५ रुपयांवर गेला आहे. एमएस (माईल्ड स्टील)चा दर मार्चपूर्वी सरासरी ६५ ते ६६ रुपये किलो होता. आता तो सरासरी ८५ ते ९० रुपये किलो इतका झाला आहे. बांधकामासाठीच्या स्टीलचा किरकोळ बाजारातील दर ४० रुपये किलोवरुन ६० रुपयांपर्यंत गेला आहे.

कोट

सध्या मागणी कायम असली तरी उत्पादन कमी झाले आहे. उत्पादकांना उत्पादन व विक्री परवडत नसली तरी ग्राहक व बाजारपेठेतील स्थान टिकवण्यासाठी सध्या नुकसान सोसत आहेत. स्टील उद्योजक सध्या अडचणीत आहेत. कोरोनामुळे नजीकच्या काळात काय होईल, याचाही अंदाज नाही. त्यामुळे अस्थिर वातावरण आहे.

- संजय खांबे, स्टील उद्योजक

Web Title: 34% increase in steel prices during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.