बहाद्दूरवाडीत ३३ जनावरे जळून खाक
By Admin | Updated: April 3, 2015 23:57 IST2015-04-03T23:34:28+5:302015-04-03T23:57:32+5:30
आगीचे तांडव : २५ लाखांचे नुकसान

बहाद्दूरवाडीत ३३ जनावरे जळून खाक
गोटखिंडी : बहाद्दूरवाडी (ता. वाळवा) येथील गावठाण हद्दीतील दळवी मळा परिसरात शुक्रवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत जनावरांचे १७ गोठे जळून खाक झाले. या जळीतकांडात ३३ जनावरे दगावली असून, सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. आगीमुळे मुक्या जनावरांसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीतील नुकसानीचे महसूल व पोलिसांकडून पंचनामे करण्यात आले. बहाद्दूरवाडी गावाच्या उत्तरेला गावठाण जागा आहे. या ठिकाणी राजारामबापू साखर कारखाना व वारणा साखर कारखान्यांच्या ऊसतोड मजुरांसह स्थानिक व बाहेरून आलेली रोजंदारी करणारी कुटुंबे छप्परवजा शेड घालून वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सर्वजण शेतातील कामासाठी गेले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली. भर उन्हाच्या तडाख्याने आगीने रौद्ररूप धारण केले. स्थानिक शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी व येथील बहाद्दूरवाडी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; पण उन्हाचा तडाखा असल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. तोपर्यंत आष्टा, इस्लामपूर नगरपालिका व राजारामबापू साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या; पण तोपर्यंत आगीने हाहाकार माजविला होता. तिन्ही गाड्या व ग्रामस्थांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण त्यांना यश येत नव्हते. त्यामुळे १५ म्हशी, ११ रेड्या, ४ गायी, ३ शेळ्या, कोकरे, कोंबड्या अशी ३३ जनावरे जळाली. याबरोबरच मजुरांचे संसारोपयोगी साहित्य, भांडी, धान्यही जळून खाक झाले. समीर म्हाबरी, जहाँगीर शेख, मौल्ला मुल्ला, कुमार खोत, बाजीराव खोत, भागिरथी वाघ, विलास खोत, बाबूराव निरुखे, गजानन खोत, पांडुरंग निरुखे, शंकर खोत, रामदास वडर, सुवर्णा खरळकर यांचे शेड, तर बबन कदम, गिते, संतोष गिते, बालाजी गिते, वैजनाथ जासूद, सोमनाथ केंद्रे, बासू नाईक, ठाकू राठोड यांच्या झोपड्या, जनावरे व संसारोपयोगी साहित्य या आगीत जळून खाक झाले.