साखळीचोर टोळीकडून ३२ तोळे दागिने जप्त

By Admin | Updated: June 21, 2014 00:22 IST2014-06-21T00:15:46+5:302014-06-21T00:22:28+5:30

दुचाकी ताब्यात : १२ गुन्हे उघडकीस; म्होरक्याविरुद्ध १८ गुन्हे

32 Tola ornaments seized from Chanchalichar gang | साखळीचोर टोळीकडून ३२ तोळे दागिने जप्त

साखळीचोर टोळीकडून ३२ तोळे दागिने जप्त

सांगली : रस्त्यावरून एकट्या जाणाऱ्या महिलांवर पाळत ठेवून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लंपास करणाऱ्या साखळीचोर टोळीकडून विश्रामबाग, इस्लामपूर व तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२ गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. या टोळीकडून सुमारे ३२ तोळे दागिने व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची किंमत दहा लाख रुपये आहे. टोळीने कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी दिली.
प्रकाश ऊर्फ अण्णा बाबा गवळी (वय २३, रा. संतोषी माता मंदिरजवळ, अहिल्यानगर, सांगली, मूळ गाव बार्शी, जि. सोलापूर), अमित प्रकाश कांबळे (२६), किशोर सुभाष पाटील (२७, दोघे रा. विजयनगर, सांगली) या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चार दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. प्रकाश गवळी टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्याविरुद्ध सोलापूरमध्ये साखळीचोरीचे सहा गुन्हे नोंद आहेत. तेथील पोलिसांच्या कारवाईचा ससेमीरा मागे लागल्याने तो गतवर्षी सांगलीत आश्रयाला आला. कुपवाड एमआयडीसीतील कारखान्यात तो काम करीत होता. तेथे किशोर पाटील हाही काम करीत होता. यातून दोघांची ओळख झाली. किशोरच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. गवळीने त्याला झटपट श्रीमंत होण्यासाठी चोरीचा मार्ग सांगितला. सोबत त्यांनी अमित कांबळे यालाही घेतले.
ही टोळी महिन्यातून किमान दोनवेळा तरी महिलांचे दागिने हिसडा मारून लंपास करत असे. प्रत्येक गुन्ह्यावेळी गवळी आपल्यासोबत किशोर व अमितला नेत असे. दागिने लंपास करण्यापूर्वी ते किमान दोन ते तीन तास विश्रामबाग परिसरात फिरत. गवळी दुचाकीवर मागे बसत असे. तोच दागिने लंपास करत असे. किशोर किंवा अमित दुचाकी चालवत. गुन्हा करताना त्यांनी दोन दुचाकींचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत.
वर्षभरात त्यांनी विश्रामबाग हद्दीत आठ, इस्लामपुरात दोन व तासगावमध्ये दोन अशा १२ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या ३२ तोळे दागिन्यांमध्ये गंठण, मंगळसूत्र, सोनसाखळी यांचा समावेश आहे. हे दागिने त्यांनी सांगली परिसरातील सराफास २२ हजार तोळा या दराने विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी या सराफास ताब्यात घेतले असता, त्याने विकत घेतलेले ३२ तोळे दागिने काढून दिल्याने त्याला साक्षीदार करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: 32 Tola ornaments seized from Chanchalichar gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.