मिरजेत ३२ तास मिरवणूक
By Admin | Updated: September 28, 2015 23:45 IST2015-09-28T22:01:20+5:302015-09-28T23:45:54+5:30
‘मोरयाऽऽ’चा गजर : १८५ मंडळांनी दिला लाडक्या गणरायाला निरोप

मिरजेत ३२ तास मिरवणूक
मिरज : ‘मोरयाऽऽ’च्या गजरात मिरजेतील १८५ मंडळांच्या गणेशाचे सवाद्य मिरवणुकीने विसर्जन झाले. रविवारी सकाळी सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीचा तब्बल ३२ तासानंतर सोमवारी दुपारी चार वाजता संत रोहिदास मंडळाच्या गणेश विसर्जनाने समारोप झाला. अनंतचतुर्दशीनिमित्तरविवारी सकाळी आठ वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. नदीवेस येथील शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचे सर्वप्रथम सकाळी ११ वाजता गणेश तलावात विसर्जन झाले. दुपारपर्यंत शहराच्या विविध भागातून सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका विसर्जन मार्गावर आल्या होत्या. सायंकाळी पोलीस ठाणे ते गणेश तलाव मार्गावर मोठी गर्दी झाली होती. बॅन्ड, बेन्जो, झांजपथक, लेझीम, टाळ-मृदंग, धनगरी ढोल आदी पारंपरिक वाद्यांवार तरुणांचे नृत्य सुरु होते. अनेक मंडळांनी डॉल्बीचाही जोरदार दणदणाट केला. रात्री बारापर्यंत वाद्यांच्या दणदणाटात मिरवणूक मार्ग व मार्केट चौक गर्दीने फुलला होता. ग्रामीण भागातील नागरिकांची मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. मिरवणूक मार्गावरील स्वागत कमानी विद्युत रोषणाईने झगमगत होत्या. रात्री बारा वाजता वाद्ये बंद करण्यात आल्याने मिरवणूक मार्गावरील गर्दी कमी होऊन मिरवणूक गतीने पुढे सरकली. पहाटे पाच वाजता गणेश तलावात त्रिशूल मंडळाच्या मूर्तीच्या विसर्जनाने मिरवणुकीचा समारोप झाला. गणेश तलावात १४५ मंडळांच्या गणेशाचे विसर्जन झाले. मात्र त्यानंतर कृष्णा नदीत विसर्जनासाठी गेलेल्या मोठ्या व उंच गणेश मूर्तींचे क्रेनने विसर्जन करण्यास विलंब होत असल्याने विसर्जन समारोप दुपारी चार वाजेपर्यंत लांबला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संत रोहिदास, श्रीराम, कृष्णेश्वर व कैकाडी समाज मंडळाच्या उंच गणेश मूर्तींचे क्रेनने नदीत विसर्जन होऊन समारोप झाला. (प्रतिनिधी)
बंदोबस्तावरील होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू
रविवारी सकाळी मिरवणूक बंदोबस्तासाठी आलेल्या विजय रंगराव पाटील (वय ४०, रा. बेडग) या गृहरक्षक दलातील जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रविवारी सकाळी सात वाजता मिरवणूक बंदोबस्तासाठी आलेले विजय पाटील हजेरी देऊन बंदोबस्त वाटपाच्या प्रतीक्षेत थांबले होते. याचवेळी हृदयविकाराचा झटका आल्याने विजय पाटील यांना खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शेतकरी कुटुंबातील विजय पाटील गेली वीस वर्षे गृहरक्षक दलात काम करीत होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी शासकीय रूग्णालयात त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. पोलीस अधीक्षकांनी त्यांना दहा हजार रूपये मदत जाहीर केली.
ट्रॉली ताब्यात
कृष्णा नदीत पाणी पातळी खालावली असल्याने मोठ्या मूर्ती पाण्यात तरंगत होत्या. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे विसर्जनासाठी नदीत पाणी नसल्याची तक्रार केली. पाणी कमी असल्याने मूर्ती नदीपात्रात वेगवेगळ्या ठिकाणी विसर्जित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महापालिकेने यांत्रिक बोटीतून उथळ नदीपात्रात असलेल्या गणेशमूर्ती खोल पाण्यात नेऊन सोडल्या. नदीत पाणी कमी असल्याने व क्रेनने विसर्जनासाठी विलंब होत असल्याने यावर्षी विसर्जन समारोप गतवर्षीच्या तुलनेत उशिरा झाला. उशिरा विसर्जन केल्याबद्दल पोलिसांनी संत रोहिदास, श्रीराम व कैकाडी समाज मंडळाच्या ट्रॅक्टर-ट्रॉली ताब्यात घेतल्या. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दोन गटात छायाचित्रावरून मारामारी
शिवसेनेच्या स्वागत कमानीवर छायाचित्र नसल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या चंद्रकांत मैगुरे व आनंद रजपूत यांच्या गटात मारामारी झाली. कमान वेस परिसरात दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांत पूर्ववैमनस्यातून हाणामारी झाली. पोलीस ठाण्याजवळ धनगर गल्ली व उदगाव वेस येथील दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांत पुढे जाण्याच्या वादातून मारामारी झाली. मात्र याबाबत पोलिसात तक्रार नसल्याचे सांगण्यात आले. मिरवणूक सुरू असताना रात्री किसान चौकात गर्दीत एक वळू घुसल्याने महिला व बालकांची धावपळ उडाली. या मोकाट वळूला पकडून अन्यत्र नेण्यात आले.
मंडळांचे स्वागत
मिरवणूक मार्गावर विविध पक्ष, संघटनांतर्फे उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी व कक्षातून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. सुरेश खाडे, महापौर विवेक कांबळे, महापालिका आयुक्त अजिज कारचे, प्रांताधिकारी सुभाष बोरकर, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, पंडितराव कराडे, गजेंद्र कुळ्ळोळी, मनसेचे दिगंबर जाधव, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, अतिष अग्रवाल, सचिन देशमुख, युवराज काकडे, वसंत अग्रवाल, रिपाइंचे अशोक कांबळे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते स्वागत कक्षात उपस्थित होते.
डॉल्बीच्या दणदणाटाने गॅलरी कोसळली
मिरवणुकीत पोलिसांची तीन ध्वनी मापक पथके कार्यरत होती. मात्र पोलिसांचा प्रतिबंध झुगारून अनेक मंडळांनी डॉल्बीचा वापर केला. डॉल्बीच्या दणदणाटामुळे गणेश तलावासमोरील गणेश मंदिराच्या जुन्या इमारतीच्या लाकडी गॅलरीचा काही भाग कोसळला. यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी थांबलेला एक वृध्द किरकोळ जखमी झाला. मिरवणुकीत डॉल्बीचा वापर करणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘शांताबाई, शांताबाई, गाडी सुटली शिट्टी वाजली, पोरी जरा जपून’ ही गाणी सर्वत्र वाजत होती.