युरियामिश्रित पाण्यामुळे ३१ मेंढ्यांचा मृत्यू
By Admin | Updated: March 26, 2015 00:01 IST2015-03-25T23:22:51+5:302015-03-26T00:01:42+5:30
जालिहाळ खुर्दमधील घटना : तीन लाखाचे नुकसान

युरियामिश्रित पाण्यामुळे ३१ मेंढ्यांचा मृत्यू
संख : जालिहाळ खुर्द (ता. जत) येथील गौराप्पा नामदेव पाटील यांच्या ३१ मेंढ्या व शेळ्या लिक्विड युरियामिश्रित पाणी पिल्याने मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे ३ लाख १८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी एस. जी. वाघमारे यांनी पंचनामा केला.
पूर्व भागातील जालिहाळ खुर्द गावापासून पूर्वेला एक किलोमीटरवर गौराप्पा पाटील यांचा मळा आहे. घराजवळ त्यांची द्राक्ष व डाळिंब फळबाग आहे. डाळिंबाला ठिबक सिंचन संचामधून खत देण्यासाठी युरिया व 00.५२.३४ यांचे सिमेंट टाकीमध्ये मिश्रण केले होते. सकाळी सात वाजता वीज गेली होती. औषधमिश्रित निम्मे पाणी राहिले होते. वीज आल्यानंतर हे औषधमिश्रित पाणी ठिबक सिंचन संचामध्ये सोडले जाणार होते. दुपारी अकरा वाजता गौराप्पा यांचे वडील नामदेव पाटील यांनी मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी बागेजवळ हौदाकडे आणले होते. हे युरियामिश्रित पाणी आहे याची कल्पना त्यांना नव्हती. कळपातील सर्व शेळ्या-मेंढ्यांनी हे पाणी पिल्यानंतर १0 ते १५ मिनिटांमध्ये जागेवरच ३१ शेळ्या-मेंढ्या तडफडून मृत्युमुखी पडल्या.पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ येऊन औषधोपचार केले. वेळेत उपचार न झाल्याने ३१ शेळ्या-मेंढ्या दगावल्या. यामध्ये २७ मेंढ्या व ४ शेळ्या आहेत. कळपातील सहा मेंढ्या, सात कोकरे व चार शेळ्या वाचल्या. (वार्ताहर)
गाभण शेळ्या-मेंढ्यांचे प्रमाण अधिक
मृत्युमुखी पडलेल्या शेळ्या-मेंढ्यांमध्ये १६ मेंढ्या, तीन शेळ्या गाभण होत्या. याचा मोठा फटका शेतकऱ्याला बसला आहे.
पूर्वीपासून पाटील कुटुंबीय शेतीबरोबरच शेळ्या-मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. कळपातील धष्टपुष्ट असलेल्या शेळ्या-मेंढ्याच मेल्या आहेत. फक्त लहान शेळ्या-मेंढ्या शिल्लक राहिल्या.