जिल्ह्यात ३०३ चालकांचे ‘लायसन्स’ रद्द

By Admin | Updated: March 4, 2015 23:44 IST2015-03-04T22:19:12+5:302015-03-04T23:44:51+5:30

आरटीओंचा दणका : सहा महिन्यांसाठी कारवाई; तळीरामांची संख्या अधिक

303 drivers 'license' canceled in the district | जिल्ह्यात ३०३ चालकांचे ‘लायसन्स’ रद्द

जिल्ह्यात ३०३ चालकांचे ‘लायसन्स’ रद्द

सचिन लाड - सांगली -दारूच्या नशेत वाहन चालविणे, वाहन चालवत मोबाईलवर संभाषण व बेदरकारपणे वाहन चालवून लोकांचा बळी घेणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याची मोहीम पोलीस व आरटीओ यांनी संयुक्तपणे सुरूकेली आहे. या तीनही गुन्ह्यांतील ३०३ चालकांचे वाहन चालविण्याचे परवाने (लायसन्स) निलंबित करण्याच्या जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी पाठविलेल्या प्रस्तावाला आरटीओ दशरथ वाघुले यांनी मंजुरी दिली आहे. सर्व चालकांचे लायसन्स जप्त करून ते सहा महिन्यांसाठी निलंबित केल्याचा आदेश वाघुले यांनी जारी केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लायसन्स निलंबित करण्याची ही पहिली कारवाई झाल्याने खळबळ माजली आहे. दारूच्या नशेत वाहन चालवून स्वत:सह दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या तळीरामांविरुद्ध पोलीसप्रमुख सावंत यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या कारकीर्दीत जोरदार मोहीम उघडली. आठवड्यात किमान तीन ते चारवेळा नाकाबंदी करून तळीरामांची धरपकड केली जाते. कारवाईत सातत्य राहिल्याने रात्री नऊनंतर रस्त्यावर शुकशुकाट असतो. न्यायालयात दंड भरून तळीराम पुन्हा नशेत वाहन चालवितात. अशांचे लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव न्यायालयात सादर केला होता. न्यायालयाने त्यास मंजुरी देऊन पुढील कार्यवाही आरटीओ वाघुले यांना करण्याचा आदेश दिला होता. वाघुले यांनी तब्बल २१५ तळीरामांचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. या सर्वांचे लायसन्स जप्त केले आहे. बेदरकारपणे वाहन चालवून लोकांचा बळी घेणाऱ्या संशयित वाहनचालकांचे लायसन्स निलंबित करण्यासाठी सावंत यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून त्यांनी आरटीओंना सादर केला होता. यातील १५ चालकांचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे. गेल्या दोन वर्षांत झालेल्या अपघातांची माहिती काढण्यात आली आहेत. यातील चालकांची यादी काढण्याचे काम अद्याप सुरू आहे. प्रत्येक महिन्याला नव्याने प्रस्ताव करून मंजुरीसाठी आरटीओंकडे पाठविले जात आहेत. महिन्याभरात चारशेहून अधिक चालकांचे लायसन्स निलंबित करण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.
त्याचप्रमाणे मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध गेल्या दीड महिन्यापासून पोलिसांनी धरपकड मोहीम सुरू केली आहे. चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र शे-दोनशे रुपयांच्या या दंडाची भीती वाहनचालकांना राहात नाही. ते पुन्हा मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालवितात. अपघातांच्या संख्येत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे त्यांचेही लायसन्स निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार यातील ४३ चालकांचे लायसन्सही सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे.

प्रलंबित प्रस्तावांवर लवकरच निर्णय
वाघुले म्हणाले, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारची कारवाई केली आहे. वाहतूक नियमांचे सर्वांनी पालन केल्यास अपघात टळू शकतात. वाहतूक नियम व कायदा काय असतो, हे या कारवाईतून वाहनचालकांनी समजून घ्यावे. तळीराम, मोबाईलवरील संभाषण व अपघात प्रकरणातील अनेक चालकांचे लायसन्स निलंबित करण्यासाठी प्रस्ताव आलेले आहेत. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. लायसन्स निलंबित केले असल्याने या वाहनचालकांना आता वाहन चालविता येणार नाही. तसे त्यांनी केल्यास पुन्हा कारवाई होऊ शकते.

Web Title: 303 drivers 'license' canceled in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.