गुंड म्हमद्याला ३० दिवसांची मुदत
By Admin | Updated: November 26, 2015 00:13 IST2015-11-26T00:13:36+5:302015-11-26T00:13:36+5:30
न्यायालयाची नोटीस : हजर न झाल्यास फरार जाहीर करण्यात येणार...

गुंड म्हमद्याला ३० दिवसांची मुदत
सांगली : संजयनगर व कुपवाड पोलीस ठाण्याकडील खंडणीच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित गुंड म्हमद्या नदाफ याला पोलिसांत हजर होण्यासाठी न्यायालयाने ३० दिवसांची मुदत दिली आहे. तशी नोटीसही बुधवारी न्यायालयाने जारी केली. मुदतीत म्हमद्या हजर न झाल्यास त्याला न्यायालयाकडून फरार जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिली.
म्हमद्या नदाफवर त्याचा एकेकाळचा साथीदार मनोज माने याच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. यापूर्वीही त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. मनोज माने खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन हल्लेखारांना अटक केली. मुख्य संशयित म्हमद्या अद्यापही पोलिसांना चकवा देत आहे. त्याच्या शोधासाठी कर्नाटकसह अनेक ठिकाणी पोलीस पथके पाठविण्यात आली आहेत. म्हमद्याला मदत करणाऱ्या हितचिंतकांभोवतीही पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. त्याच्या ७० मदतगारांपैकी ३० जणांचे जबाब घेतले आहेत. त्यांच्याविरोधात पोलिसांनी सर्वच पातळ्यांवर आघाडी उघडली असून, त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी म्हमद्याला पोलिसांनी वॉन्टेड म्हणून जाहीर केले आहे. आता संजयनगर व कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडणीच्या गुन्ह्यात तो फरार आहे. त्याला फरार जाहीर करण्यासाठी पोलिसांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. न्यायालयाने या दोन्ही गुन्ह्यात म्हमद्याला पोलिसात हजर होण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. हजर झाला नाही तर, त्याला फरार घोषित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
मालमत्तेवर टाच येणार
गुंड म्हमद्याची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. आता न्यायालयाने त्याला पोलिसांत हजर राहण्यासाठी मुदत दिली आहे. ही मुदत संपल्यानंतर तो हजर न झाल्यास त्याला फरार घोषित करण्यात येईल. त्यानंतर त्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.