जिल्ह्याला डाळिंब विमाभरपाईचे २९.५८ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:49 IST2021-02-21T04:49:15+5:302021-02-21T04:49:15+5:30
केंद्र सरकारच्या मदतीने पीकविमा योजनेंतर्गत खरीप आणि रब्बी पिकांचा विमा उतरविला जातो. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यात डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात ...

जिल्ह्याला डाळिंब विमाभरपाईचे २९.५८ कोटी
केंद्र सरकारच्या मदतीने पीकविमा योजनेंतर्गत खरीप आणि रब्बी पिकांचा विमा उतरविला जातो. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यात डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचा विमा उतरविण्याकडे कल वाढला आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या फळपिकांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंचनामे केले होते. मात्र दीड वर्षे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित होते.
जिल्ह्यात डाळिंब विमा योजनेसाठी सहा हजार १९१ शेतकऱ्यांनी दोन कोटी ६३ लाख ८८ हजार ६७७ रुपयांचा विमा भरला होता. त्यांच्यासाठी एकूण विमा संरक्षित रक्कम ५२ कोटी ७७ लाख ७३ हजार ३५४ रुपये होती. शेतकऱ्यांना या रक्कमेच्या ५२ टक्के विमा रक्कम मंजूर आहे. हवामानावर आधारित विमा योजनेंतर्गत सहा हजार १५९ शेतकऱ्यांना २९ कोटी ५८ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. जत तालुक्यातील सर्वाधिक चार हजार ४८ शेतकऱ्यांना मदत मिळाली. माडग्याळ मंडलमध्ये एक हजार ४०१ शेतकऱ्यांना एक कोटी २१ लाख रुपये भरपाई मिळाली. आटपाडी तालुक्यातील दोन हजार दहा शेतकऱ्यांना चार कोटी १७ लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली.
दहा हजार ४५१ द्राक्षबागायतदारांनी ९७ लाख ७२ हजार रुपयांचा विमा भरला होता. नुकसान झालेल्या सहा हजार ५१५ शेतकऱ्यांना ९ कोटी २१ लाख ५४ हजारांची मदत मिळाली. आटपाडी तालुक्यातील ४६८ शेतकऱ्यांना एक कोटी ८३ लाख, जत तालुक्यातील एक हजार ४५३ शेतकऱ्यांना दोन कोटी १४ लाख, कडेगावमधील ९५ शेतकऱ्यांना ७४ लाख पाच हजार, कवठेमहांकाळमधील दोन हजार २४७ शेतकऱ्यांना दोन कोटी ९८ लाखांची भरपाई मिळाली. खानापूर, मिरज, पलूस, तासगाव, वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनाही भरपाई मिळाली आहे.
चौकट
जिल्ह्यातील आंबा उत्पादक १७६ शेतकऱ्यांनी सहा लाख ३६ हजार रुपये विमा भरला होता, त्यापैकी १२० शेतकऱ्यांना २० लाख ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई बँक खात्यावर जमा झाली.