सांगली : महापालिका क्षेत्रात गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेच्यावतीने २८ ठिकाणी कृत्रिम कुंड तयार करण्यात आली आहेत. याशिवाय मुर्तीदानसाठी २२ केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी शुक्रवारी दिली.
सांगली शहरात रणझुंजार चौक, बदाम चौक, विष्णू घाट, टिळक चौक, सांगलीवाडी चिंचबाग, साखर कारखाना, नेमीनाथनगर, स्फूर्ती चौक, काॅलेज काॅर्नर, त्रिमूर्ती काॅलनी, कुस्ती आराखडा कोल्हापूर रोड आदी १६ ठिकाणी कृत्रिम कुंड तयार केली आहेत. कुपवाडमध्ये वसंतनगर, आंबा चौक, शारदानगर, सह्याद्रीनगर, बिरनाळे हायस्कूल, समृद्धीनगर या आठ ठिकाणी, तर मिरजेत गाडवे चौक, डाॅ. आंबेडकर उद्यान, समतानगर वेअर हाऊस व पाटील हौद या चार ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड आहेत.
महापालिकेने विसर्जनासाठी सहा कृत्रिम तलावही उभारले आहेत. सांगलीत पत्रकारनगर, जगदाळे प्लाॅट संजयनगर, दसरा चौक, वाडीकर मंगल कार्यालय, कुपवाडला विद्यानगर वारणाली, तर मिरजेत रमा उद्यान येथे कृत्रिम तलावाची सोय केली आहे. मूर्तिदानासाठीही २२ केंद्र सुरू केली आहेत. सांगलीत सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट, सांगलीवाडी चिंचबाग, नेमीनाथनगर, हाॅटेल पै प्रकाशमागे, काॅलेज काॅर्नर, कुपवाडला खताळनगर, वसंतनगर, आंबा चौक, मिरज ओढ्यालगत, मिरजेत साईनंदन काॅलनी, गाडवे चौक, कृष्णा घाट, गणेश तलाव आदी ठिकाणी मूर्ती स्वीकारल्या जाणार आहेत.
नागरिकांनी कृत्रिम कुंड, तलावात गणपतीचे विसर्जन करावे. तसेच गणेशाच्या मूर्ती दान करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही कापडणीस यांनी केले आहे.