सांगलीत २७५ विद्यार्थ्यांची वाहने जप्त
By Admin | Updated: February 9, 2015 23:56 IST2015-02-09T23:50:07+5:302015-02-09T23:56:00+5:30
विनापरवाना सवारीला दणका : शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात नाकाबंदी

सांगलीत २७५ विद्यार्थ्यांची वाहने जप्त
सचिन लाड -सांगली -वाहन चालविण्याचा परवाना नसताना (लायसन्स) नसताना खुलेआम दुचाकीवरुन महाविद्यालय व खासगी शिकवणीला जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनीविरुद्ध जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व वाहतूक पोलिसांनी गेल्या चार दिवसांपासून उघडलेल्या विशेष कारवाईच्या मोहिमेतंर्गत आतापर्यंत लाससन्स नसलेल्या २७५ दुचाकी वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. लायसन्स नसताना पालक मुलांना वाहन कसे देतात? याचा जाब विचारण्यासाठी पोलिसांनी पालकांना बोलावून घेतले. यापुढे लायसन्स नसताना मुलगा वाहन चालविताना आढळून आल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असा दम दिला आहे.पंधरा दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलाचा विश्रामबाग चौकात अपघात मृत्यू झाला. याची जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी दखल घेऊन शाळा, महाविद्यालयात व खासगी शिकविणीसाठी दुचाकीवरुन जाणाऱ्या विद्यार्थ्यांची धरपकड करुन त्यांच्याकडे लायसन्स आहे का नाही, याची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.
सुरुवातील संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर दुसऱ्यादिवशी सांगलीच्या वाहतूक शाखेने जोरदार मोहीम राबविली. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय व खासगी शिकवणीजवळ पोलिसांनी नाकाबंदी करुन केवळ विद्यार्थ्यांना अडवून तपासणी सुरु केली होती. या कारवाईमुळे विद्यार्थ्यांनी दुचाकीसह घराबाहेर पडणे बंद केले आहे.
पालकांनी आपल्या मुलांना वाहन चालविण्याचा परवाना असल्याशिवाय गाडी देऊ नये, अन्यथा अशा बेजबाबदार पालकांवरही गुन्हे दाखल केले जातील, अशी सूचना देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना त्रास देणे हा कारवाईमागचा हेतू नाही. वाहतूक नियमांची माहिती नसताना पालक त्यांना वाहन कसे देतात. त्यांच्याकडे लायसन्स नाही. वाहन चालविण्यास आले म्हणून झाले का? या सर्व गोष्टींना पालक कारणीभूत आहेत.
- संजय गोर्ले, पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, सांगली.
वाहतूक पोलिसांची कारवाई योग्य आहे. विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे पालन व वाहन चालविण्याचा परवाना घेऊनच वाहतुकीच्या िनयमांनुसारच वाहन चालविण्याची सवय अंगीकारली पाहिजे.
- शुभम जाधव,
विद्यार्थी प्रतिनिधी,
जी. ए. महाविद्यालय, सांगली