आॅनलाईन शॉपिंगचा व्यापाऱ्यांना २५% फटका
By Admin | Updated: June 4, 2015 00:01 IST2015-06-03T23:03:02+5:302015-06-04T00:01:39+5:30
सांगलीत पंधरा कुरिअरची सेवा : युवा वर्गच सर्वात मोठा ग्राहक; इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठी उलाढाल--लोकमत विशेष

आॅनलाईन शॉपिंगचा व्यापाऱ्यांना २५% फटका
अंजर अथणीकर -सांगली
प्रत्यक्ष बाजारात जाऊन चोखंदळपणे खरेदी करण्याची पद्धत आता हळूहळू कमी होत आहे. इंटरनेटच्या पसाऱ्यातून घरबसल्या ग्राहकांनी चोखंदळ होणे पसंद केले आहे. त्यामुळे आॅनलाईन शॉपिंग हा नवा प्रकार आता बाजारपेठ काबीज करू लागला असून, गेल्या सहा महिन्यात सांगलीच्या बाजारपेठेला याचा २५ टक्के फटका बसला आहे. विशेषत: याचा सर्वाधिक फटका इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या व कपड्याच्या बाजारपेठेला बसत आहे. पर्यायांची उपलब्धता, माफक किमती आणि घरपोहोच सेवा या जोरावर आॅनलाईन शॉपिंगने हळूहळू बाजारपेठेला आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे.
आॅनलाईन शॉपिंग तसे वर्षापूर्वी सुरू झाले असले तरी, गेल्या सहा महिन्यात हा व्यवसाय अधिक फोफावला आहे. यासाठी सांगलीत आता आॅनलाईन कुरिअर कंपन्यांचीही संख्या वाढली आहे. वर्षापूर्वी सुरू झालेली आॅनलाईन कुरिअर कंपन्यांची संख्या आता पंधराहून अधिक झाली आहे. उत्पादक कंपन्यांबरोबर आॅनलाईन कुरिअर कंपन्यांचा करार झाला असून, उत्पादक कंपन्या त्यांचे साहित्य विमान, रेल्वे, बस व खासगी वाहनांच्या माध्यमातून ग्राहकांच्या पत्त्यावर पाठवून देतात. कुरिअर कंपनीमध्ये आलेले साहित्य ग्राहकांना घरपोहोच करण्यात येते. यासाठी कंपनीने वस्तूवर आकारलेली किंमत ग्राहकांकडून घेऊन ती परत उत्पादक कंपनीकडे पाठविण्यात येते. मागणी केलेली वस्तू ४८ तासात ग्राहकांना घरपोहोच मिळते. उत्पादक कंपनी दूरची असेल, तर ग्राहकांना वस्तू मिळण्यास जास्तीत जास्त ७२ तासांचा वेळ लागू शकतो. ग्राहकाकडून पैशाची तजवीज होईपर्यंत तीन दिवसापर्यंत अशा वस्तू कुरिअरच्या गोदामामध्ये ठेवल्या जातात. विनंती केल्यास त्याचा अवधी वाढवला जातो. त्यामुळे ग्राहकांना कंपनीच्या वस्तू थेट व वाजवी किमतीत मिळत असल्याचा कंपन्यांचा दावा आहे.
आॅनलाईन शॉपिंगची विश्वासार्हता वाढावी म्हणून प्रत्येक कंपनी प्रयत्न करीत आहे. ग्राहकांच्या नेमक्या अडचणी शोधून त्याबाबतची कंपनीची धोरणे ठरविण्यात येत असल्याचे चित्र आहे.
दररोज शंभरावर ग्राहकांचे कुरिअर
सध्या प्रत्येक कुरिअर कंपनीस दररोज सरासरी शंभरावर ग्राहकांना आॅनलाईन शॉपिंगच्या वस्तू पोहोच कराव्या लागत आहेत. सांगली परिसरात रोज दीड हजारावर अधिक ग्राहकांकडून आॅनलाईन खरेदी होत आहे. दिवसेंदिवस ग्राहकांची संख्याही वाढत आहे. युवा पिढीचा व श्रीमंत ग्राहकांचा याकडे ओढा वाढल्याची माहिती आॅनलाईन कुरिअरच्या चालकांंनी दिली.
आॅनलाईन शॉपिंगचा बाजारपेठेवर सुमारे २५ ते ३० टक्क्यापर्यंत परिणाम झाला आहे. आम्हीही घाऊक प्रमाणात वस्तू मागवतो. मात्र यातील खराब झालेली वस्तू परत मिळविण्यासाठी खूप मानसिक त्रास होतो. त्यासाठी महिनाही उलटून जातो. सध्या युवापिढीला आॅनलाईन खरेदीचा छंद जडला आहे.
- हिरो राजमाने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे व्यापारी, सांगली
आॅनलाईन शॉपिंगचे अधिक तर ग्राहक युवा पिढी आहे. त्यामुळे फॅशनेबल कपडे, गॉगल्स, मोबाईल, लॅपटॉपचा अधिक व्यवसाय होत आहे. आलेले साहित्य परत जाण्याचे प्रमाण जवळपास दहा टक्के आहे. दिवसेंदिवस याचे ग्राहक वाढत असून, ग्राहकांसाठी हा व्यवहार सोयीचा व वाजवी किमतीत होत आहे.
- राहुल कांबळे, कुरिअर व्यावसायिक, सांगली
आॅनलाईन बाजारात
मिळते
सर्वकाही...
आॅनलाईन शॉपिंगद्वारे अलीकडे कडधान्ये आणि किराणा सामानही मागविण्यात येत असले तरी, सर्वाधिक प्रमाण मोबाईल खरेदीचे आहे. त्यासोबत टी शर्ट, जीन्स, तयार कपडे, गॉगल, लॅपटॉप, एलसीडी-एलईडी, संगणक, महागड्या साड्या, अत्तर, सौंदर्यप्रसाधने आदींचा यामध्ये अधिक समावेश आहे.
आॅनलाईन विक्री सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या वेबसाईटच्या जाहिराती प्रसारमाध्यमांतून प्रसारित होत असून, वेबसाईटवरून ग्राहक पसंतीच्या वस्तूंची मागणी करीत आहेत. संगणक-मोबाईलवरून नोंदणी करून मागणी केली जाते.