सुमनताई पाटील यांच्यासह २४ कार्यकर्त्यांना जामीन
By Admin | Updated: June 14, 2016 00:03 IST2016-06-14T00:02:19+5:302016-06-14T00:03:29+5:30
दुष्काळी आंदोलन : जमावबंदी आदेशाचे केले होते उल्लंघन

सुमनताई पाटील यांच्यासह २४ कार्यकर्त्यांना जामीन
तासगाव : येथे मार्च २0१५ मध्ये दुष्काळ जाहीर करा, यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या आ. सुमनताई पाटील, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. जमावबंदी असताना बेकायदा जमाव जमवत आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी आमदारांसह २५ पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी सोमवारी न्यायालयाने प्रत्येकी साडेसात हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची मुक्तता केली. मात्र अनिल जाधव गैरहजर राहिल्याने त्यांचा जामीन झाला नाही.
तासगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, पाणी योजना सुरु करा, चारा छावण्या सुरु करा, यासह अनेक मागण्यांसाठी आ, सुमन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने रास्ता रोको आंदोलन केले होते. मात्र सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी या आंदोलनास परवानगी नाकारली होती व तहसीलदारांना निवेदन द्या, असे सांगण्यात आले होते. मात्र जमावबंदीचा आदेश झुगारुन साडेबारा ते सव्वा एकच्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन केले होते. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे यांनी फिर्याद दिली होती.
आ. सुमन पाटील यांच्यासह हणमंत देसाई, अमोल शिंदे, मारुती पवार, अशोक घाईल, जाफर मुजावर, अनिल जाधव, कमलेश तांबवेकर, स्वप्निल जाधव, अमोल पाटील, जगन्नाथ पाटील, अविनाश पाटील, निवास पाटील, युवराज पाटील, संजय पाटील, दिनकर पाटील बेंद्री, खंडू पवार, दिनकर पाटील, खंडू एडके, विलास नलवडे, कुमार पाटील, विलास पाटील, अक्षय शिंदे, इद्रीस मुल्ला व योजना शिंदे या २५ जणांवर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. (वार्ताहर)
साडेसात हजाराचा जामीन
सोमवारी दोषारोप पत्रांसह आमदार सुमनताई पाटील यांच्यासह सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने २४ जणांची प्रत्येकी साडेसात हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.