शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत डांगे अभियांत्रिकीचे २३ विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:27 IST2021-03-31T04:27:34+5:302021-03-31T04:27:34+5:30
आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २३ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ऋतुजा नवले ...

शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत डांगे अभियांत्रिकीचे २३ विद्यार्थी
आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २३ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ऋतुजा नवले व प्रणाली गोंधळी यांनी तसेच एरोनॉटिकल इंजिनियरिंगमधील संचिता नयाल या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव अॅड. चिमण डांगे व कार्यकारी संचालक प्राध्यापक आर. ए. कनाई यांनी दिली.
अॅड. चिमण डांगे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या तेवीस विद्यार्थ्यांमध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग विभागाचे १०, सिव्हिल इंजिनिअरिंगमधील ६ आणि ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग विभागातील ७ विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश मिळवत महाविद्यालयाचा लौकिक वाढवला आहे.
प्रा. आर. ए. कनाई म्हणाले, महाविद्यालयाने गुणवत्तेबाबत कधीच तडजोड केलेली नाही. महाविद्यालयात राबवण्यात येणाऱ्या नवनवीन शैक्षणिक उपक्रमांत या विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचा वाटा आहे. जगभरामध्ये या महाविद्यालयाचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असून, त्यांनी आपापल्या क्षेत्रात कामाचा ठसा उमटवला आहे.
संस्थेचे संचालक डॉ. विक्रम पाटील म्हणाले, राष्ट्रीय पातळीवर महाविद्यालयाचा लौकिक वाढावा व त्यामध्ये सातत्याने सुधारणा व्हावी म्हणून महाविद्यालयाचे मूल्यांकन राष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या संस्थांकडून करण्यात आले आहे. महाविद्यालयातील सर्व पात्र अभ्यासक्रमांना एनबीए नवी दिल्ली यांच्याकडून मूल्यांकन झाले असून, २०१५ मध्ये महाविद्यालयाचा नॅक बंगळुरू यांच्याकडून ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. या महाविद्यालयाला आयएसओ ९००१ : २०१५ मानांकन प्राप्त झाले असून, सर्व अभ्यासक्रमांना शिवाजी विद्यापीठाकडून निरंतर संलग्नीकरण मिळालेले आहे. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि जिमखाना आहे. विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करता यावे व बाहेरील जगामध्ये होत असलेल्या बदलाप्रमाणे शिक्षणपद्धती व अभ्यासक्रम यामध्ये बदल करता यावेत, यासाठी २०१७-१८ पासून हे महाविद्यालय स्वायत्त बनले आहे. डांगे अभियांत्रिकी हे राज्यातील सर्वांत तरुण महाविद्यालय आहे. शिवाजी विद्यापीठाकडून या महाविद्यालयास गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेत निमशहरी विभागातून प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, सचिव अॅड. चिमण डांगे, कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई, प्राचार्य डॉ. विक्रम पाटील, प्रा. एस. बी. हिवरेकर, डॉ. सुयोगकुमार तारळकर, प्रा. सुहेल सय्यद यांच्यासह सर्व प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.