जिल्हा बँकेसाठी २२०७ मतदार पात्र
By Admin | Updated: March 26, 2015 00:01 IST2015-03-25T23:24:40+5:302015-03-26T00:01:15+5:30
अंतिम यादी जाहीर : मिरज, वाळव्याचे वर्चस्व; वैयक्तिक गट रद्द

जिल्हा बँकेसाठी २२०७ मतदार पात्र
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज, बुधवारी अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी २२०७ मतदार पात्र ठरले असून एकूण मतदारसंख्येत ५० मतदारांची नव्याने भर पडली आहे. वाळवा व मिरज या दोन्ही तालुक्यात पन्नास टक्के मतदार असल्याने त्यांचेच वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले. येत्या दहा दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून मतदान मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे संकेत आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदारयादीत २१५६ मतदार होते. या यादीवर काही संस्थांनी आक्षेप घेत ठराव सादर केले होते. नव्याने ठराव सादर करण्यास दोन मार्चची मुदत होती. या कालावधित ५० संस्थांनी ठराव दिले. आज जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी अंतिम मतदारयादी जाहीर केली. त्यात २२०७ मतदार पात्र ठरले आहेत. बँकेच्या निवडणुकीसाठी वैयक्तिक गट यावेळी रद्द करण्यात आला आहे. या गटातील सभासदांचा समावेश क (३) मध्ये करण्यात आला आहे. मतदारांची संख्या अशी : आटपाडी १५०, कवठेमहांकाळ १५४, खानापूर १२७, जत १६६, तासगाव १७९, मिरज ४१८, वाळवा ४९५, शिराळा १९८, पलूस १७७, कडेगाव १४३.
मिरज व वाळवा या दोन तालुक्यात मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या दोन्ही तालुक्यांचेच वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. या दोन्ही तालुक्यात मदन पाटील व आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. या दोन तालुक्यात उमेदवारीवरून मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)