जिल्ह्यातील २१३० आशा, गटप्रवर्तक बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:36 IST2021-06-16T04:36:13+5:302021-06-16T04:36:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील २१३० आशा, गटप्रवर्तक महिलांनी कामाचा योग्य मोबदला देण्यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत काम ...

जिल्ह्यातील २१३० आशा, गटप्रवर्तक बेमुदत संपावर
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील २१३० आशा, गटप्रवर्तक महिलांनी कामाचा योग्य मोबदला देण्यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याबाबत सर्व आशा, गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषद, जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे.
जिल्ह्यात १८२५ आशा, १०५ गटप्रवर्तक आणि शहरांमधील २०० आशांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन देऊन बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले की, सिटूसह विविध संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या कृती समितीतर्फे या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या संपाबाबतच्या निवेदनात म्हटले की, आशा व गटप्रवर्तकांकडून जीव जोखमीत घालणारी कामे करून घेतली. मात्र, कोणताही अतिरिक्त मोबदला दिला नाही. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या सर्व्हेचे कामही अतिरिक्त मोबदला न देता करून घेण्यात आले. आता अँटिजन चाचणी घरोघरी जाऊन करण्याची जबाबदारीही आशांवर टाकली आहे. कोविड काळातील कामाचा अतिरिक्त मोबदला द्या, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा स्वतंत्र मोबदला द्या, कायम नियुक्तीची पत्रे द्या, नियमित वेतनात भरीव वाढ करा, या प्रमुख मागण्यांसाठी हा संप आहे. जिल्ह्यातील सर्व आशा, गटप्रवर्तकांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.
संघटनेच्या सरचिटणीस सुमन पुजारी, आयटक आशा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ. शंकर पुजारी, कॉ. विद्या कांबळे, चांदनी साळुंखे यांच्यासह आशा, गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांना मागण्याचे निवेदन दिले.